एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट

जाहिरात
Read Time: 3 mins
सोलापूर:

एप्रिल महिन्याचे जेमतेम १० दिवस संपतायत आणि राज्य भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल करतंय. निम्म्याहून अधिक राज्यात आतापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा मराठवाड्याला बसतायत. त्यापाठोपाठ विदर्भ आणि खान्देशातही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय. सोलापूरात एक हजार लीटरचा टँकरच्या भाव सध्या २५० रुपये आहे. तर ८ हजार लिटर साठी 800 रुपयांवर गेलाय.  तर तिकडे बुलडाण्यात १ हजार लीटरच्या टँकरसाठी ५०० रुपये मोजावे लागताय. धाराशिवमध्येही 1 हजार लीटरचा टँकरचा भाव १०० रुपयांवरुन २०५ रुपयांवर म्हणजे दुप्पट झालाय. यामुळे टँकर माफिया बोकाळायला सुरुवात झालीय. 


निम्मा महाराष्ट्र टँकरवर 
एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच राज्यात पाणीटंचाईचे स्वरूप आणखी तीव्र झाले आहे. कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहेत. राज्यात एकूण एक हजार ८५८ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, या पाणीबाणीत टँकर लॉबी मालामाल होत आहे.

Advertisement

राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा
उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण झाले आहे. उन्हाळ्यात महिला व पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईची समस्या निकाली निघू शकली नाही. त्यामुळे या योजनांवर झालेला खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकदा टँकर लॉबीला मालामाल करण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते. येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे. प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे. विहिरी कोरड्या पडत आहेत, तर बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. ही टंचाई टँकर लोबीला मालामाल करणारी ठरत आहे, तर दुसरीकडे टँकरमुक्तीची घोषणाही हवेत विरली आहे. 

Advertisement

या जिल्ह्यात शून्य टँकर 
सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्यावर आहे. सध्या इथं पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यामुळे टँकर्सना मागणी नाही. पण जसजसा उन्हाचा कडाका वाढेल तसं या जिल्ह्यातली टँकरची मागणी वाढेल. 

Advertisement

टँकर माफीयाची लूटालूट 
वेगवेगळ्या शहरात टँकर माफीयांनी सर्व सामान्यांची सध्या लुट चालवली आहे. सोलापूर शहरात एका पाण्याच्या  टँकरची किंमत  एक हजार लिटर साठी 250 रुपये घेतली जात आहे. तर  8000 लिटर पाणीसाठा 800  रुपये आकारले जातात.  सर्वसाधारण एप्रिल -मे मधली ही किंमत असून इतर वेळी हाच  टँकर पाचशे ते सहाशे रुपयाला मिळतो. 

बुलढाणा धाराशीव मध्येही सुरू आहे लूट 
2 हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी तब्बल 1000 रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागात 50 रुपयाला एक 200 लिटरचा ड्रम भरून मिळतो. तर पूर्वी 2 हजार लिटर पाणी 500 रुपयाला मिळत होते. आता उन्हाळ्यात त्याचं पाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पुढील दोन महिने कडक उन्हाळा आहे. अगोदरच यावर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे. धाराशीवमध्ये उन्हाळ्यापूर्वी ८० रुपयाला पाचशे लिटरचा मिळणारा टँक आता 125 रुपयाला मिळत आहे. तर 1000 लिटरचा १५० रुपयाला मिळणारा टॅंक आज 205 रुपयाला मिळत आहे.