माढ्यात पुन्हा तिढा! आमदार बबन शिंदेंना शरद पवार गटात घेण्यास विरोध, मविआ नेत्यांची फिल्डिंग 

Madha Election News : माढा येथे मिनल साठे यांच्या नेतृत्वात बबन शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटकांची आणि काँग्रेस पदाधिकारी यांच्यात बैठक झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, माढा , पंढरपूर 

माढा मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारीच्या प्रयत्नात आमदार बबन शिंदे आहे. मात्र आमदार बबन शिंदे यांच्या उमेदवारीला आता काँग्रेस नेते आणि माढा शहराच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी विरोध केला आहे. आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात नुकतीच माढात बैठक झाली. 

माढा मतदारसंघाचे राजकारण लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही रंगतदार होताना दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पक्षात जाऊन उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांचा ओढा दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनीही तब्बल 4 वेळा शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत शरद पवारांची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी बबन शिंदे प्रयत्नशील आहेत. अशातच बबन शिंदे यांच्या उमेदवारीस आता थेट काँग्रेस नेत्या तथा माढा नगराध्यक्षा मीनल साठे यांनी उघड विरोध केला आहे. 

माढा येथे मिनल साठे यांच्या नेतृत्वात बबन शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटकांची आणि काँग्रेस पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बबन शिंदे यांना माहाविकास आघाडीत घेण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. यासाठीच आता काँग्रेसच्या साठे गटाने पुढाकार घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी साठे यांनी केली आहे. त्यामुळे बबन शिंदे यांच्या शरद पवार यांच्या गटातील उमेदवारीचे भवितव्य काय असणार? याबाबत शंका निर्माण झाली आहे. बबन शिंदे यांना शरद पवार गटात घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील विरोध केला आहे. संजय कोकाटे यांचाही बबन शिंदे यांना विरोध आहे. यानंतर आता काँग्रेस नेत्या मिनल साठे यांनीही विरोध केला आहे.