बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या हत्येनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. शिवाय सध्या राज्यात पोलिसांचे राज्य राहीले नाही, तर गुंडा राज सुरू झाले आहे अशी टिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवाय पोलिसामंध्ये दोन गट पडले असल्याचा गौप्यस्फोट ही केला आहे. त्यातूनच हवा तो अधिकारी हव्या त्या ठिकाणी ठेवला जात आहे असेही ते म्हणाले. शिवाय सत्ताधारी पक्षातीलच नेते सुरक्षित नसतील तर सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये संदर्भात सत्ताधारी महायुती सरकार वर कठोर शब्दांत टीका केली आहे. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांनी आता जाहिरातीच्या फलकात "तुमची सुरक्षा तुम्ही करा, सरकार जबाबदार नाही" असे फलक जागोजागी लावले पाहीजेतय. त्यानंतर लोक आपापली सुरक्षा स्वत: करतील, अशी वेळ महाराष्ट्रावर आली" असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले. राज्यात सध्या गुन्हेगारांवर वचक राहीला नाही. सत्ताधारी गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवाय महाराष्ट्रात पोलीसांत दोन ग्रुप पडले आहे. आपल्या अधिकारी यांना हव्या त्या ठिकाणी नियुक्त केले जात आहे. त्याचा थेट परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होत आहे. असेही वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्र युपी आणि बिहारच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्री यांना विचारतो, तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? असेल तर बसा. असा खोचक सल्लाही वडेट्टीवार यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दिला. दसऱ्याच्या दिवशी नेत्याची हत्या होते. यावरून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे हेच समजत आहे. असे ही वडेट्टीवार म्हणाले.
बाबा सिद्दीकी राजकारण समाजकारणात सक्रिय असणारे नेते होते. ते काही कारणाने काँग्रेस सोडून अजित पवारांकडे गेले. त्यांना वायप्लस सुरक्षा होती. असे असताना ही घटना घडणे अधिक गंभीर आहे असेही ते म्हणाले. अशा वारंवार घडणाऱ्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी नेत्यांसोबत अशी घटना घडणे म्हणजे कायद्याचा आणि पोलिसाचा धाक कुठेही राहिलेला दिसतं नाही. असेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world