Pune News : माऊलींच्या वारी मार्गातील 100 वर्षे जुना ऐतिहासिक पूल इतिहासजमा होणार, स्थानिकांचा विरोध

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जाताना नीरा नदी पार करतो आणि याच पुलावरून दत्त घाटावर निरास्नानासाठी पादुकांची मिरवणूक नेली जाते.

जाहिरात
Read Time: 3 mins

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Pune News : नीरा नदीवरील सुमारे १०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी पूल पाडण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी नीरा व पाडेगाव परिसरात तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याशी ऐतिहासिक आणि भावनिक नातं असलेला हा पूल पाडण्याऐवजी त्याचं जतन करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने सुरक्षेचा मुद्दा पुढे करत निर्णय घेतला असला, तरी स्थानिक नागरिकांनी हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप केला आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जाताना नीरा नदी पार करतो आणि याच पुलावरून दत्त घाटावर निरास्नानासाठी पादुकांची मिरवणूक नेली जाते. त्यामुळे या पुलाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे. पूर्वी पालखी मार्ग सासवड–शिरवळ–लोणंद असा लांबचा असल्याने नीरा नदीवर पूल उभारण्याची मागणी पुढे आली होती. त्यानंतर १९२७ साली इंग्रज काळात अभियंता मांडके यांच्या पुढाकारातून या पुलाचे बांधकाम करण्यात आले. जवळपास ९९ वर्षे उलटूनही हा दगडी पूल आजही भक्कम स्थितीत असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत.

Advertisement


अचानक पूल धोकादायक कसा ठरवला, स्थानिकांची सवाल..

सध्या या ठिकाणी पर्यायी नवीन पूल उपलब्ध असून वाहनांची वाहतूक त्यावरून सुरू आहे. मात्र जुना पूल पादचारी, दुचाकीस्वार तसेच दत्त मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरतो. दररोज शेकडो नागरिक दर्शनासाठी तसेच सकाळच्या फिरण्यासाठी या पुलाचा वापर करतात. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून स्थानिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. प्रशासनाने तो पूर्णपणे पाडण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, पुलावर कुठेही मोठी तडे किंवा दगड निखळल्याचे दिसत नाही. दरवर्षी प्रशासनाकडून डागडुजीही केली जाते, मग अचानक हा पूल धोकादायक कसा ठरवण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे नीरा नदीवरच आणखी एक सुमारे १४० वर्षे जुना दगडी रेल्वे पूल अद्याप वापरात आहे. मग एक पूल सुरक्षित आणि दुसरा धोकादायक कसा, याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

नक्की वाचा - Pune Traffic News: गुगल मॅप्सच्या मदतीने पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल


पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट काय सांगतं? 


दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून त्यात पूल धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हजारो भाविक या पुलावरून जात असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पूल हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी हा निर्णय पुनर्विचारासाठी ठेवण्याची मागणी केली आहे. माजी उपसरपंच राजेश काकडे म्हणाले, प्रशासनाने तांत्रिक कारणांवर निर्णय घेतला असेल, पण याच परिसरातील  १४० वर्षे जुना पूल दुरुस्त करून वापरात ठेवला आहे. मग हा पूल दुरुस्त करून पादचारी आणि दुचाकींसाठी सुरू ठेवण्यात काय अडचण आहे? हा पूल नीरा आणि पाडेगाव गावांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय योग्य नाही.”

पाडेगावचे माजी सरपंच रघुनाथ धायगुडे यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रचंड पुराच्या पाण्यालाही तोंड देऊन हा पूल आजपर्यंत ठाम उभा आहे. नव्याने बांधलेले अनेक पूल अल्पावधीत कोसळल्याच्या घटना घडतात, मग हा पूल अचानक असुरक्षित कसा ठरतो? स्ट्रक्चरल ऑडिट कोणी केले आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करावा,” अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे पालखी सोहळा विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन करत सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागील दोन वर्षांपासून पूल कमकुवत झाल्याच्या सूचना मिळत होत्या. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ऐतिहासिक वारसा आणि सुरक्षेचा प्रश्न यामध्ये समतोल साधत प्रशासनाने पर्यायी उपाय शोधावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पूल पाडण्याचा निर्णय कायम राहतो की ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्याचे जतन करण्याचा मार्ग निघतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.