प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील एक नाव आहे ते म्हणजे चैत्राम पवार यांचे. त्यांनी पर्यावरण क्षेत्रात केल्या कार्याचा पद्म पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावी पणे त्यांनी राबवले होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक गावांचे जिवनमान उंचावले होते. शिवाय पर्यावरणाचे संवर्धनही झाले होते. त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार मिळाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा आदिवासींचा पाडा आहे. या पाड्याची 1992 पूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती. इथं सर्व काही उजाड होतं. समोर ओसाड माळरान होतं. पिण्यासाठी घोटभर पाणी मिळत नव्हतं. पाण्यासाठी तर वणवण करावी लागत होती. मात्र 1992 नंतर या पाड्याचे चित्र पालटलं. चैत्राम पवार या पाड्याच्या मदतीला धावले. गावातले लोक रोजगारासाठी गावात सोडत होते. गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत होती. अशा वेळी पवार यांनी हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला. वन रक्षणासाठी त्यांनी समिती तयार केली. झाडांची लागवड केली गेली. शिवाय त्यांची निगाही राखली गेली. एकीकडे ओसाड असलेल्या या जमिनीवर बघता बघता जंगल तयार केले. याचे सर्व श्रेय पवार यांचे होते. त्यासाठी त्यांनी गावकऱ्यांची मदत घेतली. त्यांच्या जागृती निर्माण केली. त्यांना जंगलाचं महत्व पटवून दिलं.
त्यांच्या या लोक चळवळीची दखल महाराष्ट्रानेच नाही तर जगाने घेतली होती. जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने दुसरा क्रमांक मिळवला होता. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी करुन दाखवलेल्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारने ही केला होता. चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार देण्यात आला. जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे त्यांनी संरक्षण केले होते. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून 400 हेक्टर जंगलाचे संरक्षण केले. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास 5,000 हून अधिक झाडे लावली होती. जैवविविधतेचे संवर्धनाच्या माध्यमातून 8 दुर्मीळ प्राणीप्रजाती, 48 पक्षीप्रजाती, व 435 झाडे, वेली, व झुडुपांच्या प्रजातींना आश्रय दिला.
मृदा व जलसंधारणातही त्यांनी काम केलं. समाजाच्या सहकार्यातून 485 लहान बंधारे, 40 मोठे बंधारे बांधले त्यांनी बांधले. 5 किलोमीटर कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस (CCT) तयार करून धुळे जिल्ह्यात भूगर्भजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढवली होती. बारिपाडा गावात PBR म्हणजेच पिपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपक्रम राबवून पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय वारसा जपण्यासाठीचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्याच बरोबर महाराष्ट्र व गुजरातमधील 100 हून अधिक गावांत आदिवासी विकास, पर्यावरण संरक्षण, आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे.