मनोज सातवी, पालघर:
Palghar Crime: बंद दगड खाणीत पडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. पालघर तालुक्यातील मनोर जवळील टाकवहाल परिसरात ही घटना घडली. या दुर्घटनेतील एका मुलाचा मृतदेह सापडला असून अद्याप एक जण बेपत्ता आहे. अग्निशमन दलाकडून दुसऱ्या मुलाचाही रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खाणीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
पालघर मध्ये मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळील टाकवहाल परिसरातील बंद दगड खाणीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. या घटनेत जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह सापडला असून आयुष मुकेश पवार (वय १५) याचा शोध अद्याप सुरू आहे.
दोन्ही मुले मध्य प्रदेशातील इंदोर येथून मनोर परिसरात आलेल्या कुटुंबातील असल्याची माहिती आहे. ही कुटुंबे रोजगारासाठी आले असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाकडून रात्री उशिरा पर्यंत शोधमोहीम सुरू होती.