मनोज सातवी
अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे. सरकारने मदत जाहीर केली आहे. पण ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचली नाही. या मदतीची त्यांना अजूनही प्रतिक्षाच आहे. पालघर जिल्ह्यात मोठी प्रमाणात भात शेती केली जाते. मात्र यावेळी झालेल्या अवकाळी पावसाने याच भात शेतीचं होत्याचं नव्हतं झालं. हाता तोंडाशी आलेलं सर्व पीक वाया गेलं. हाती काहीच लागलं नाही. शेतात भात खराब झाला आहे. त्याला मोड आले आहेत अशी स्थिती आहे. हे दुख: कमी की काय विमा कंपनीनं पालघरच्या एका शेतकऱ्याच्या जखमेवरच मिठ चोळण्याचे काम केले आहे.
मधुकर पाटील हे पालघरच्या शिलोत्तर गावचे शेतकरी आहेत. त्यांची भात शेती आहे. पण अवकाळीमुळे या भात शेतीचे नुकसान झालं आहे. त्यांनी प्रसिद्ध असलेल्या वाडा कोलमची लागवड केली होती. त्यातून काही उत्पन्न मिळेल असं वाटत होतं. पण झालं भलतचं. त्यात निसर्गाची अनियमितता पाहाता त्यांनी विमा काढला होता. त्याचा हफ्ता ही भरला होता. पण ज्या वेळी नुकसान झाले त्यावेळी याच विमा कंपनीनं त्यांना नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यात 2 रुपये 30 पैसे जमा केले. तसा मेसेज ही पाटील यांना पाठवण्यात आला.
हा मेसेज पाहून पाटील यांच्या जखमेवरच मिठ चोळले गेले. त्यांच्यासाठी तर हा एक धक्काच होता. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे का असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. वाडा कोलमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यात आता अशी मदत पाठवून शेतकऱ्याची चेष्टा लावली आहे की काय असा प्रश्न मधुकर पाटील यांनी केला आहे. पंतप्रधान फसल वीमा योजनेअंतर्गत हे पैसे जमा झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. आम्ही हतबल झालो आहोत. काय करायचं कुणाकडे जायचं असा प्रश्न आमच्या समोर आहे असं ही ते म्हणाले.
झालेलं नुकसान हे छोटं नाही. झालेलं नुकसान हे मोठं आहे. आम्हाला आता कोणी वाली नाही. शेतऱ्याला कुणी वाली नाही. सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहीजेत. नाही तर हा शेतकरी परत कधीच उभा राहू शकणार नाही. विम्यासाठी आपण 1148 रूपयांचा हफ्ताही भरला होता. असं असताना मदतीची रक्कम ही दोन रुपयेच पाठवण्यात आली. आपल्या पार झोपून गेलेलं शेत पाहून पाटील यांना अश्रूही अनावर होत नाहीत. ते एक टक आपल्या शेताकडे पाहात राहातात. मोठ्या कष्टाने उभं केलं पण एक नैसर्गिक संकटाने ते पार झोपवलं अशी भावना त्यांची झाली आहे.