Pandharpur Ashadhi Wari 2025 : पंढरपुरात राहण्याची सोय कुठे आहे? खर्च किती आणि कसे कराल बुकींग?

Pandharpur Ashadhi Wari 2025 : यंदाच्या वारीमध्ये विशेष म्हणजे भाविकांना वास्तव्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निवाराशेड उभा करण्यात आलेले आहेत.  गेल्या वर्षी पर्यंत एकात्मिक निवारा शेड यांच्या माध्यमातून शहराच्या चारही बाजूला मोठे मंडप उभा केले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

पंढरपूर/ संकेत कुलकर्णी 

महाराष्ट्राला आषाढीचे वेध लागले आहेत. आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात 15 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या संख्येने भाविक आल्यावर या भाविकांना वास्तव्यासाठी शहरात तब्बल 1250 मठ , 100 भक्त निवास तर शासनाचे मोफत निवारा शेड उपलब्ध असणार आहेत. वारकरी हा मॅनेजमेंट गुरु मानला जातो. याच वारकऱ्यांच्या वास्तव्यासाठी पंढरपूर शहर देखील विठ्ठलभक्तांना कुशल मॅनेजमेंटने आपल्या कुशीत वसवून घेते.

आषाढीसाठी सर्व संतांच्या पालख्या एकादशीपूर्वी अर्थात नवमी आणि दशमी अशा दोन दिवशी पंढरपुरात येत असतात. यंदा 6 जुलै रोजी एकादशीचा सोहळा आहे. अर्थात 4 आणि 5 जुलै रोजी भाविक पंढरपुरात येतील. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांना वास्तव्याची गरज भासणार आहे. सामान्यपणे पंढरपुरात येणारा भाविक संत गजानन महाराज मठ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे भक्तनिवास किंवा खाजगी भक्तनिवास, लॉजेस यांना प्राधान्य देत असतो. मात्र वारी काळात वाढत्या लोकसंख्येने अशा ठिकाणी राहणे देखील जिकरीचे होते. 

(नक्की वाचा - Wari News: तुकाराम महाराजांच्या पालखीने पार केला रोटी घाट, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हेनगरीत)

अनेक लॉजेस हे वारी पूर्वी दोन महिने फुल होतात. तर मठ आणि सामान्य भक्त निवासामध्ये वारकऱ्यांना राहण्याची मुबलक सोय होते. अनेक भक्त निवासांचे बुकिंग yatradham.com या संकेतस्थळावरून सहज होते. तर काही भक्तनिवासात भक्त थेट संपर्क करून बुकिंग करू शकतात. याशिवाय मंदिराच्या नगरप्रदक्षिणा परिसरापासून ते शहराच्या चारही बाजूंमध्ये अनेक वारकरी सांप्रदायिक मठ स्थापित आहेत. या मठांची किमान संख्या 1250 इतकी आहे. 

मठांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची सोय

काही मठांमध्ये त्यांच्या संबंधित दिंड्या उतरतात. अशावेळी जागा शिल्लक असेल तर वारकरी भक्तांना देखील वास्तव्याला प्राधान्य दिले जाते. मठामध्ये वारकरी भक्त राहिला तर निश्चितच भजन, किर्तन , हरिपाठ अशा अध्यात्मिक वातावरणात त्याचे वास्तव्य राहते. शिवाय दररोज विठ्ठलाचा भोजन प्रसाद देखील सहज मिळतो. आणि यासाठी नाममात्र मठाच्या संस्थांनची ऐच्छिक देणगी पावती राहते. त्यामुळे भाविकांच्या खिशाला परवडेल असे वास्तव्य मठांमधून मिळते. 

Advertisement

घरांमध्ये राहण्याची परंपरा

पूर्वी वारी भरायची त्यावेळी वारकरी भाविक विठ्ठल मंदिर परिसरातील अनेक घरांमध्ये वास्तव्य करायचे. आजही घरांमधून राहण्याची परंपरा चालू आहे. अगदी शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत घरामध्ये वास्तव्याला जागा मिळते. अगदी दिवसभर पंढरपुरात राहणार असाल. तर 50 रुपयात पिशवी ठेवायला ही जागा मिळते. मंदिर परिसरातच वास्तव्य असल्याने भाविकांना चंद्रभागा नदी, विठ्ठल मंदिर आणि नगरप्रदक्षिणा अगदी हाकेच्या अंतरावर मिळते. त्यामुळे पूर्वपार आलेले भाविक आजही मंदिर परिसरातील घरांमधून वास्तव्याला प्राधान्य देतात. 

(नक्की वाचा-  Pandharpur Palkhi Wari 2025 : माऊलींच्या पालखीचं वाल्हेतून प्रस्थान, नीरास्नानासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह)

मोठे भक्तनिवास, लॉजेसमध्येही व्यवस्था

मोठे भक्तनिवास किंवा लॉजेस यामधील रूम 700 रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत मिळते. मात्र याचे काही वेळा अॅडव्हान्स बुकिंग होत असते. तर काही ठिकाणी थेट भाविकांना रूम उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे अनेक लॉज , चांगल्या दर्जाच्या सुविधा देणारे हॉटेल्स हे दशमी एकादशी आणि द्वादशी अशा तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी 30000 पासून 50 हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज उपलब्ध करतात. यामध्ये वास्तव्य आणि भोजनाची देखील सुविधा उपलब्ध असते. असे पंढरपुरात किमान 20 ते 22 हॉटेल्स सध्या आहेत. 

Advertisement

यंदाच्या वारीमध्ये विशेष म्हणजे भाविकांना वास्तव्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निवाराशेड उभा करण्यात आलेले आहेत.  गेल्या वर्षी पर्यंत एकात्मिक निवारा शेड यांच्या माध्यमातून शहराच्या चारही बाजूला मोठे मंडप उभा केले होते. या मंडपात भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी , जवळच स्नानगृह व स्वच्छतागृह , आणि मोबाईल चार्जर ची सुविधा अशा सेवांसह मोफत वास्तव्यासाठीचे शासनाचे निवारा शेड वारकरी भक्तांसाठी उपलब्ध होतात. असेच शेड यांनाही पंढरपूर शहरात प्रवेश करताना अनेक ठिकाणी उभा केले जाणार आहेत. या शेड पासून विठ्ठल मंदिराचे अंतर जरी चार ते पाच किलोमीटर पर्यंत असले. तरी वारकरीभक्त यांची मोफत राहण्याची व्यवस्था याठिकाणी होणार आहे.