Pandharpur News: आषाढी वारीनिमित्त सलग 15 दिवस मटण अन् मांस विक्री बंद; प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय

Pandharpur News: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात इतिहासामध्ये पहिल्यांदाच सलग १५ दिवस मटण आणि मांस विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

Pandharpur News: लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूरमध्ये धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करण्यासाठी प्रशासनाने एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहरात तब्बल 15 दिवस मटण आणि मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

विठ्ठल भक्तांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वारीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कालावधीसाठी मांस विक्री बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

15 ते 29 जुलै दरम्यान दुकाने राहणार बंद

शासकीय आदेशानुसार, पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये 15 जुलै ते 29 जुलै या १५ दिवसांच्या कालावधीत सर्व प्रकारची मटण, चिकन, मासे आणि मांस विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहतील. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी संप्रदायात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. त्यामुळे वारीच्या काळात पंढरपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील वातावरण संपूर्णपणे विठ्ठलमय व सात्त्विक ठेवण्याचा प्रयत्न या निर्णयाच्या माध्यमातून केला जात आहे.

(नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

प्रांताधिकाऱ्यांनी जारी केले कडक आदेश

आषाढी वारीच्या यात्रा काळात लाखो भाविक पंढरपुरात मुक्कामी असतात. या काळात कोणत्याही प्रकारे वारकरी भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी सचिन इथापे यांनी तात्काळ प्रभावाने हे मांस-मटण बंदीचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर आणि व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायाकडून आणि विठ्ठल भक्तांकडून अत्यंत स्वागत केले जात आहे.
 


Topics mentioned in this article