संकेत कुलकर्णी, पंढरपूर
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या हत्याकांडाच्या घटनेने बीडमधील गुन्हेगारी उजेडात आली आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा उघडकीस येत आहेत.
अशातच वाल्मिक कराडचा आणखी कारनामा समोर आला आहे. ऊसतोड मशिनला 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराडने 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरमधील शेतकऱ्याने हे गंभीर आरोप केले असून भितीपोटी तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
ऊसतोड मशिनला 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो असे सांगून वाल्मिक कराडने 140 लोकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याचा आणि ते पैसे परत न केल्याचा खळबळजनक दावा पंढरपूरमधील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे यांचीही ऊस तोड मशीन असून त्यांच्यासह एकूण 140 लोकांकडून वाल्मिक कराडने पैसे हडपल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे.