Pandharpur News : महाराष्ट्राचं आराध्य दैवत.... पंढरपूरचा विठूराया...ज्या विठ्ठलानं कधी गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा भेद केला नाही.... ज्याच्या दारात भेदाभेद भ्रम अमंगळ असतात, तो हा विठूराया. महाराष्ट्राचं हे लाडकं दैवत घरोघरी पोहोचलं ते तुकोबांच्या अभंगातून आणि माऊलींच्या ओव्यांमधून. मराठी साहित्यालाही समृद्ध करणाऱ्या या विठ्ठलाच्या दारात आता हिंदी-मराठी असा वाद सुरू झाला आहे. त्याला निमित्त ठरलं ते पंढरपुरात 9 ऑगस्टला झालेल्या तुळशीपूजेचं. पंढरपुरातल्या पुजाऱ्यांनी ही तुळशीपूजा हिंदीमधून सांगितल्याचा दावा विठ्ठलभक्त राहुल सातपुते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
राहुल सातपुतेंचं ट्विट...
पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुळशी अर्चन पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. तुकाराम भवनात झालेल्या या पूजेला माझ्या कुटुंबासह 30 ते 35 कुटुंबं उपस्थित होती. सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या. तेवढ्यात 30-35 कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणालं की त्यांना मराठी कळत नाही, म्हणून पूजा हिंदीत घ्यावी. गुरुजींनी लगेच हसत हसत होकार देऊन संपूर्ण पूजा हिंदीत सुरू केली. मी सांगितलं – “आपण महाराष्ट्रात आहोत. आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही. महाराष्ट्राची राजभाषा मराठी कळते. त्यामुळे कृपया मराठी भाषेत सूचना द्या.” त्यावर गुरुजी माझ्यावर चिडले आणि म्हणाले – “या माणसाचा काय विषय आहे?
सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसाशी बोला. त्याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही. ‘आपल्याला पूजेतून बाहेर काढतील' या भीतीने एकाही मराठी कुटुंबानं माझ्या म्हणण्याला पाठिंबा दिला नाही. गुरूजी म्हणाले “तुमच्या एकट्या कुटुंबासाठी आम्ही मराठी मधून पूजा घेऊ शकत नाही.” त्याठिकाणी एक हिंदी कुटुंब सोडून बाकी सर्व कुटुंबं मराठी होती. पूर्ण पूजा हिंदी मधून पार पडली.
नक्की वाचा - वाशिमच्या महिला सरपंचाचा देशभरात डंका; स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यास लाल किल्ल्यावर खास आमंत्रण
राहुल सातपुते यांनी पूजेच्या भाषेबद्दल केलेली ही तक्रार मंदिर समितीनं गांभीर्यानं घेतलीय..विठ्ठलाच्या मंदिरात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशी तीन वेळा तुळशीपूजा होते. या पूजेमधली स्त्रोस्त्रं संस्कृत भाषेत असतात. त्यानंतर पूजेचे विधी आचमन, संकल्प, विठ्ठल रुक्मिणीचं स्मरण आणि विष्णूसहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये केलं जातं. पूजेसंदर्भातली माहिती मराठीमधून दिली जाते. मात्र एखादं कुटुंब अमराठी असेल तर त्यांना समजण्यासाठी हिंदीतून अर्थ सांगितला जातो, असा मंदिर समितीचा दावा आहे.
पूजा मराठीतूनच होते, असा मंदिर समितीचा दावा असला तरी 9 ऑगस्टला जी तुळशी पूजा झाली, त्यामध्ये प्राधान्यानं हिंदीचा वापर झाल्याचा समोर आलंय. त्यामुळे आता या पुजाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. पुजारी दोषी आढळल्यास कारवाईही केली जाणार आहे. तर दुसरीकडे मनसेही या प्रकरणात आक्रमक झाली आहे.
या सर्व प्रकारानंतर सर्वसामान्यांसह मनसेही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
- एखाद्याला समजलं नाही म्हणून हिंदीत समजावून सांगितलं जाऊ शकतं.
- पण परप्रांतीयांचे लाड करत पूजेची भाषाच बदलावी, हे काही योग्य नाही.
- माझ्या मराठीची बोलू कौतुके... अमृतातेही पैजा जिंके...असं माऊलींनी म्हटलं.
- त्यामुळे विठ्ठलाच्या दारी आणि गाभारीसुद्धा आपल्या मायमराठीचीच पूजा व्हावी.