संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Pandharpur Tractor Accident: पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावरून रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ट्रॅक्टर आणि कंटेनर खाली कोसळले गेले. या अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर आठ लोक गंभीर जखमी आहेत. कर्नाटकातून ऊसतोडी करून कामगार आपल्या घरी परतत असताना ट्रॅक्टर पुलावरून कोसळून अपघात घडला.
पंढरपुरात ट्रॅक्टर, कंटेनरचा अपघात
याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्नाटक राज्यात ऊस तोडी करून पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ऊस टोळी आपल्या मूळ गावी निघाली होती. घरापासून अवघे वीस किलोमीटर जवळ असताना पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचा पुलावर प्रवेश करताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट पुलावरून खाली कोसळला. याचवेळी समोरून येणारा कंटेनरच्या चालकाचाही ताबा सुटला व ट्रॅक्टर सोबत कंटेनरही कोसळला. कंटेनरमध्ये केवळ ड्रायव्हर आणि एक व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ट्रॅक्टरमध्ये ऊस तोडी करून आलेले नऊ लोक होते. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
Amravati Politics: बंडखोरांना दणका! अमरावतीत भाजपची सर्वात मोठी कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ
ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावरून खाली कोसळला. यावेळी महादेव दिलीप काळे ( वय 50 ) आणि राजू रमेश चव्हाण ( वय 40 ) अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मण राजेंद्र चव्हाण, सुवर्णा ज्ञानेश्वर पवार , अनिता भारत काळे , विनोद सुखदेव गोमटे , नाना हनुमंत काळे तर देवांगी आणि गुड्डू या आठ आणि चार वर्षे भावंड या अपघातात जखमी झाले आहेत. याशिवाय ब्रिजेशकुमार हा कंटेनरमधील इसम देखील जखमी झाला.
ऊसतोड कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
आठ जखमी व्यक्तींपैकी चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असून हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्याच्या मोठ्या घटना घडल्यात. चार गंभीर जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी पंढरपूरहुन सोलापूरच्या रुग्णालयास रात्री उशिराने पाठवण्याची तयारी डॉक्टरांनी केली होती. संबंधित घटना घडताच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, प्रणव परिचारक , तालुका पोलीस निरीक्षक वाय टी मुजावर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघात घडल्यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलीस व काही स्थानिक तरुणांनी एकत्रित येऊन क्रेनच्या मदतीने कंटेनर आणि ट्रॅक्टर बाजूला केले. सुरुवातीला या वाहनांच्या खाली काही व्यक्ती असल्याचा संशय होता. एक ते दोन व्यक्ती पानांच्या खाली अडकून देखील सापडले. हे व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पुलावर घडलेल्या अपघातामुळे पुलावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हा अपघात घडल्याने पुलाचा काही भाग धोकादायक बनत चालला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आहिल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी देखील होताना दिसत आहे.