- पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत असून पुरातत्व विभागाने सखोल पाहणी करून अहवाल दिला आहे
- विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप करण्यासाठी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे
- विठ्ठल मूर्तीवर पूर्वीही अनेक वेळा वज्रलेप केले गेले असून ते अंतिम निर्णयानंतरच होईल
संकेत कुलकर्णी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे. याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून अहवाल दिला आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप होणार आहे. या आधी ही पांडूरंगाच्या चरणांची झीज झाली होती. त्यावेळी वज्रलेप लावण्यात आला होता. यावेळी ही हीच प्रक्रीया पार पडणार आहे.
पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही स्वयंभू समजली जाते. याच विठ्ठल मूर्तीच्या चरणांची सध्या झीज होत आहे. भारतातील एकमेव असे तीर्थक्षेत्र आणि देवता म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते की जिथे स्पर्श दर्शन आहे. त्यामुळेच विठ्ठलाच्या चरणांची झीज होताना दिसते. याबाबत काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी विठ्ठल मूर्तीची सखोल पाहणी केली. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती अर्थात मंदिर प्रशासनास तसा अहवाल दिला. हा अहवाल पुरातत्व विभागाने सादर केला आहे.
पुरातत्त्व विभागाने दिलेला अहवाल मंदिर समितीने शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शनासाठी आणि परवानगीसाठी सादर केला आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या परवानगी नंतरच विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप करण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून समजत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर कोरोना काळात सन 23 आणि 24 जुलै 2020 रोजी मूर्ती जतन आणि संवर्धनासाठी लेपन करण्यात आले होते. विठ्ठलाच्या मूर्तीवर सर्वप्रथम 1988 साळी लेपण झाले. यानंतर 2005 , 2012 आणि 2020 साली वज्रलेप करण्यात आला. यास वज्रलेपला एपॉक्सी लेप असेही म्हटले जाते.