संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Pandharpur Accident: पंढरपूरातील अनिल नगर परिसरात राहणारं बावचे कुटुंब... हसता खेळता संसार, सुखी परिवार.. मात्र याच सुखाला दृष्ट लागली. रविवारी म्हसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेण्यासाठी हे कुटुंब निघाले, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होते. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ एका भरलेल्या विहिरीत पिकअप गाडी कोसळली. या दुर्घटनेत गाडीतील 15 जणांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बावचे कुटुंबातील सहा जणांचा समावेश होता. कालपर्यंत भरलेलं घर क्षणात रिकामं झाले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
नियतीचा क्रुर खेळ.. ८ जणांवर अंत्यसंस्कार, अख्ख गाव रडलं!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर गावातील भाविक मिनी पीकअप टेम्पो भाड्याने करून म्हसवड येथील सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. देवाचे दर्शन घेऊन अत्यंत आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सर्वजण आपल्या गावाकडे परतत होते. मात्र, माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक येताच चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि हा अनियंत्रित टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत थेट कोसळला.
विहिरीत पाणी असल्याने आणि टेम्पो पूर्णपणे उलटल्याने आत अडकलेल्या भाविकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अपघात इतका भयानक होता की विहिरीतून येणाऱ्या निष्पाप लहान मुलांच्या आणि महिलांच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी 8 मृतदेह बाहेर काढले.
पूजा अमोल साकोरे (23) आरव अमोल साकोरे (8) पूजा बालाजी बावचे (27), समर्थ बालाजी बावचे (6 महिने)अश्विनी संदीप बावचे (27) संस्कार संदीप बावचे (14) संस्कृती संदीप बावचे (14) आजी इंदुबाई दशरथ बावचे (60) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रविवारी रात्री उशिराने मृत्यू पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मध्यरात्रीनंतर उशिराने यांच्यावर पंढरपुरातील गोपाळपूर रोडच्या वैकुंठ स्मशान भूमीत सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अत्यंत शांततेत व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
हळत खेळतं कुटुंब क्षणात संपलं, घरात उरले फक्त दोघे..!
सर्वात दुर्दैवी म्हणजे कालपर्यंत लहान मुलांनी भरलेलं बावचे कुटुबांचं घर ओस पडलं आहे. घरातील सहा सदस्य काळाने हिरावल्याने आता घरात फक्त दोनच सदस्य उरलेत. संपूर्ण कुटुंबाचे अंत्यसंस्कार झाल्यावर बावचे कुटुंबातील दोन्ही भाऊ आता आपल्या आजोळ घरी गेलेत. नियतीने घातलेल्या या क्रुर घाल्याने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अशी वेळ कुणावरही येऊ नये, हीच भावना प्रत्येक जण व्यक्त करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world