संकेत कुलकर्णी
पंढरीच्या वाटेवर अगदी पाच दिवसांवर पालखी सोहळा आला आहे. अशातच आता पालखीतील नयनरम्य असे रिंगण सोहळे सुरू होतात. मात्र नक्की रिंगण का केले जाते ? असा प्रश्न अनेकांना आहे. पायीवारी करत असताना विसाव्याच्या ठिकाणचा आनंद उत्सव आणि आपल्या सोबत असणाऱ्या संतांना प्रदक्षणा घालण्यासाठी रिंगण सोहळा होतो. विसाव्याच्या ठिकाणी रिंगण झाल्यानंतर परमात्मा विठ्ठल भेटीची ओढ अधिक जाणवू लागते. यासाठीच रिंगण सोहळ्याला पंढरीच्या पायी वारी अनन्य साधारण महत्त्व आहे. नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया । सुख देईल विसावां रे. अशा संत वचनाप्रमाणे वारकरी भक्त हे आपल्या आराध्य असणाऱ्या भगवान पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी नाचत गात पंढरपूरला येतात. यामधील विसावा क्षणी वारकऱ्यांना आनंद मिळावा, म्हणून आनंदाचा स्वर्गसुख सोहळा हा रिंगण समजला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाच गोल रिंगण तर तीन उभे रिंगण होत असतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन प्रकारचे रिंगण...
रिंगण सोहळा प्रामुख्याने गोल रिंगण आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारात होत असतात. गोल रिंगणामध्ये संतांच्या पादुका मधोमध ठेवून त्या पादुकांना प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. यामध्ये अनेक वेळा वारकरी खेळ आणि भजन करतात. उभे रिंगण हे सरळ रेषेत होते. यामध्ये पंढरीच्या वाटेकडे जाणारा मार्ग हाच भक्तिमार्गाचा सुख सोहळा आहे, असा आभास होतो. असे प्रामुख्याने मानले जाते.
असे होते गोल रिंगण...
पालखी सोहळ्यातील गोल रिंगणामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील. यांच्या पादुका आणि पालखी एका मोठ्या मैदानात मधोमध ठेवल्या जातात. आणि मग रिंगण होते. या रिंगणातून संतांच्या पादुकांना प्रदक्षिणा केली जाते. अशी भावना आहे. या पादुकांच्या भोवतीने प्रारंभी मानाचे अश्व हे दौड करत असतात. या अश्वावर साक्षात संत विराजमान झाले आहेत. अशी भावना भक्तांची आहे. हा अश्व धावल्यानंतर अश्वाच्या टापेखालची माती आशीर्वाद म्हणून कपाळी लावण्यासाठी भक्तांची धडपड असते. अश्वांचे धाव झाल्यानंतर विणेकरी, पखवाज वादक आणि डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला धावत असतात. रिंगण सोहळा हा पायी वारीत चालत असताना शिनवटा घालवण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. यातून नवी ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा पायी चालण्यासाठी भाविक सज्ज होत असतो.
विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश
असे होते उभे रिंगण...
उभे रिंगण सोहळा हा प्रामुख्याने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात जास्त आहे. यामध्ये पंढरपूरच्या वाटेवर अर्धा मैल मानाचे अश्व हे धावत असतात. हे आश्वांवर संत विराजमान आहेत अशी भावना आहे. यातून आपला अंतिम विसावा पंढरपूर आहे. पंढरपुरच्या रस्त्याचा इशारा या रिंगण सोहळ्यातून होतो. अशी भावना आजकालच्या नव्या पिढीतील वारकऱ्यांची आहे. गोल रिंगणाप्रमाणेच उभे रिंगण सोहळ्यात टाळकरी , विणेकरी आश्वाच्या मागे धावतात. यामध्ये केवळ संतांच्या पादुकांना प्रदक्षिणा होत नाही, मात्र पंढरीच्या वाटेकडची ओढ अधिक दृढ होत असते.
आषाढीसाठी पंढरपुरात 52'मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र', ही आहेत वैशिष्ट्य
रिंगणातील वारकरी खेळ
रिंगण सोहळ्यामध्ये केवळ अश्व धावतोच असे नाही. अश्वाच्या सोबतीने धावणारे विणेकरी , टाळकरी यांचाही भजनी रंगात रंगून उडीचा खेळ मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसतो. यामध्ये अनेक वेळा भजन करत असताना व उडीचा खेळ खेळताना वारकरी भक्त मनोरे लावताना दिसतात. हा खेळ खेळताना वारकऱ्यांच्या मुखी केवळ विठ्ठल नामाचा जयघोष असतो. अशा वारकरी खेळांमधून पंढरीच्या वाटेवर पायी चालण्याची अधिक ऊर्जा मिळते, अशी धारणा आहे.