Pankaja Munde News : भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतो का? NDTV मराठीच्या 'मंच'वर पंकजा मुंडेंचं बेधडक उत्तर

महिलांचं सशक्तीकरण एका महिलेच्या पदावर निर्भर नाही. असंख्य महिलांना संधी मिळाली तर संपूर्ण महिलावर्ग सशक्त होईल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pankaja Munde News : महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत राज्याला नवी दिशा देणाऱ्या महिला नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्लेव्हची थीम 'नारी शक्ती महाराष्ट्राची' अशी आहे. यामध्ये पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या स्टाईलने बेधडक  उत्तरं दिली. 

नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपने ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अनेक निष्ठावंतांना संधी दिली नाही असा आरोप केला जात आहे. त्यावरुन पंकजा मुंडे यांना 'मंच'च्या व्यासपीठावरुन प्रश्न विचारण्यात आला. याबाबत त्या म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वेगळी असते. येथे बेरजेचं गणित, निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी लागणारं कौशल्य वेगळं असतं. त्याशिवाय प्रत्येकवेळी निवडणूक लढण्याची संधी हीच संधी असते असं नाही. 

Advertisement

मला पद दिलं नाही तरीही इतरांसाठी मला आनंदच होईल...

महिलांचं सशक्तीकरण एका महिलेच्या पदावर निर्भर नाही. असंख्य महिलांना संधी मिळाली तर संपूर्ण महिलावर्ग सशक्त होईल. अनेक महिलांना संधी मिळालेली असताना मला कुठलंही पद दिलं नाही तरीही मला आनंदच होईल. अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक महिला आहेत जे या पदासाठी लायक आहेत. त्यांपैकी कुणालाही ही संधी मिळाली तरी मला आनंदच होईल, अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. 

महिला असूनसुद्धा 'हे' मिळवलं असं म्हणणारी व्यक्ती त्या महिलेला दुबळी समजत असते. 'नारी शक्ती' यामध्ये शक्तीच्या पुढे नारी लावण्याची गरज नाही. शक्ती हिच नारी आहे. शक्ती हेच मुळात स्त्री ऊर्जा आहे. उलट ज्या शक्तीविना शिवही शव आहे अशी ती शक्ती आहे.  - पंकजा मुंडे 

लाडकी बहीण योजना चालवावी का? सरकार म्हणून भूमिका काय?

लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना पंकजा मुंडे याबाबत म्हणाल्या, विरोधकांचा आरोप सन्मानाने पाहण्याची गरज आहे, असं महाराष्ट्राचं राजकारण राहिलेलं आहे. आताही ते तसच असावं असं मला वाटतं. लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना सक्षम आणि सुरक्षित वाटतंय का? ही योजना आधी कुणाला का नाही सूचली असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. महिलांना तिच्या मूळ गरजेसाठीही खूप प्रतारणा सहन करावी लागते. ही योजना राहणारच आहे. आम्ही एखादी योजना केली आणि लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य पैसे घेत असतील त्यांना थांबवणं हे सरकारचं कर्तव्य आहे.