आकाश सावंत
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. डॉ. गौरी पालवे-गर्जे हा अनंत गर्जे यांच्या पत्नी होत्या. वरळीतल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला. त्याच अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. पत्नीने आत्महत्या केल्यानंतर अनंत गर्जे यांनी पहिला फोन मंत्री पंकजा मुंडे यांना केला होता. पंकजा यांनी ही याला दुजोरा दिला आहे. शिवाय त्यावेळी नक्की काय बोलणे झाले याची माहिती ही पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय पंकजा यांचे पीए असलेल्या अनंत यांच्यावर गंभीर आरोप ही करण्यात आले आहे.
पंकजा मुंडे यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान पीए अनंत याचा फोन आला होता असं पंकजा यांनी सांगितलं. हा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला होता. त्यावेळी दुसऱ्या बाजूने अनंत खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे त्याने अत्यंत आक्रोशाने सांगितले. शिवाय तो असं ही म्हणाला की पत्नीने आत्महत्या करणे ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. त्याने आत्महत्येची माहिती देताच आपल्याला ही धक्का बसला असं ही पंकजा यांनी यावेळी सांगितलं.
पोलिसांनी कुठल्याही कारवाईमध्येकसूर राहू नये. त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. योग्य दिशेने या आत्महत्येचा तपास केला जावा असं ही त्यांनी पोलीसांना सांगितल्याचं पंकजा म्हणाल्या. दरम्यान आपण अनंतची पत्नी म्हणजेच डॉक्टर गौरीच्या वडीलांशीही बोलली असल्याचं त्यांनी सांगितले. ते प्रचंड दु:खात आहेत, त्यांची स्थिती मी समजु शकते असं ही पंकजा यावेळी म्हणाल्या. आपण त्यांनी धीर दिल्याचं ही त्यांनी सांगितलं. काळजी करून नका योग्य तपास होईल असं ही त्यांना सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अश्या घटना जीवाला चटका लावून जातात. मनाला सुन्न करतात. कोणाच्या वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. डॉक्टर गौरी पालवे-गर्जे या केईएम हॉस्पिटलमधील दंत चिकित्सा विभागामध्ये कार्यरत होत्या. गौरी आणि अनंत यांचे 7 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न बीड जिल्ह्यात झालं होतं. या लग्न सोहळ्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांसह मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या लग्नाला सात महिनेच झाले होते. त्यानंतर ही घटना घडलीय