पनवेल: पनवेल तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीत असलेल्या दाभोळवाडी या आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांच्या वेदनादायक वास्तवाला आजही कोणी वाली नाही. जिथे जिवंतपणी मुलभूत सुविधा मिळत नाहीत, तिथे मरणानंतरही शांततेने शेवटचा प्रवास घडतो की नाही, याचीही खात्री नाही. कारण या वाडीतील स्मशानभूमीवर अजूनही पत्र्याचं साधं छत नाही.
पनवेल दाभोळवाडीतील ग्रामस्थांना मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात स्मशानभूमीतील ओलेचिंब मातीचे रस्ते आणि वरून कोसळणारा मुसळधार पाऊस – अशा अवस्थेत मृतदेहावर शेवटचा संस्कार करावा लागतो. पावसात प्रेतविधी करताना पावसापासून वाचण्यासाठी अंगावर प्लास्टिकचा तुकडा धरावा लागतो. हे दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
आपटा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उजेडात
सदर स्मशानभूमीच्या विकासासाठी ग्रामपंचायतीकडे निधीची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. केवळ कागदोपत्री विकास दाखवणाऱ्या आपटा ग्रामपंचायतीचा कारभार लोकांमध्ये संतापाचा विषय ठरत आहे. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपूर्वी आश्वासनं देतात आणि त्यानंतर या आदिवासी भागांकडे पाठ फिरवतात, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
Navi Mumbai Airport : कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
दाभोळवाडीतील नागरिकांची एकच विनंती आहे – "आम्हाला मोठं काही नको, पण मरणानंतर तरी माणसासारखं शेवटचा निरोप घेता यावा, एवढं पुरे आहे." स्मशानभूमीवर पत्र्याचं छप्पर, टीन शेड किंवा कुठला तरी आडोसा असावा, जेणेकरून पावसात अंत्यसंस्कार करताना थोडं संरक्षण मिळेल पनवेल पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत – या तिन्ही यंत्रणांकडे ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, कुणीही पुढाकार घेतलेला नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळांनीही आवाज उठवला आहे, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.