
दिवाकर माने, प्रतिनिधी
Parbhani Farmer's Success Story : आजवर अनेकदा दुष्काळाचा फटका सहन केलेल्या मराठवाड्याला यंदा अतिवृष्टीचा फटका बसलाय. मराठवाड्यातील बहुतेक भागात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे जलसाठे भरले असले तरी शेतीचं मोठं नुकसान झालंय. हाता-तोंडाशी आलेलं पिक वाया गेल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर होतीय. राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. या विपरित परिस्थितीमध्येही काही शेतकरी मोठ्या कष्टानं आणि डोकं लावून शेती करत आहे. त्याचा त्यांना फायदा देखील होतोय. असं एक उदाहरण परभणी जिल्ह्यात पुढं आलंय.
काय केली शेतकऱ्यानं कमाल?
अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी सध्या अडचणीत आहेत. वारंवार पिकांचे नुकसान होत असताना, पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील एका शेतकऱ्याने वेगळा मार्ग निवडला आणि लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
पाथरी येथील प्रगतशील शेतकरी शेख फकीर शेख सुलेमान यांनी 3 एकर क्षेत्रावर सुमारे 3000 हून अधिक केळीच्या झाडांची लागवड केली होती. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन फळ लागवडीकडे लक्ष दिले. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून, केवळ 11 महिन्यांत त्यांना एका एकरातून तब्बल 27 टन केळीचे उत्पादन मिळाले आहे.
( नक्की वाचा : Success Story: 20 दिवसांच्या बाळाला घेऊन मुलाखतीला पोहोचल्या अन् बनल्या DSP; वाचा प्रेरणादायी कहाणी )
या केळीचा दर्जा अतिशय चांगला असल्याने ती निर्यातक्षम ठरली आहे. सोनपेठ येथील व्यापाऱ्यांमार्फत ही केळी आता थेट इराण देशाला पाठवली जात आहे. शेख फकीर यांना त्यांच्या केळीला प्रति क्विंटल 1500 रुपयांचा चांगला दर मिळाला आहे. या विक्रीतून त्यांना लाखोंचा नफा होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आहे.

सध्या या केळीची कापणी सुरू असून, ती व्हॅक्युम सीलबंद करून बॉक्समध्ये भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेनंतर ही केळी निर्यातीसाठी पूर्णपणे तयार होईल. शेख फकीर यांच्या या यशामुळे, नियमित पिकांव्यतिरिक्त आर्थिक लाभ देणाऱ्या पिकांकडे लक्ष देण्याचा विचार शेतकरी करत आहेत. मात्र, आधुनिकतेकडे वळताना पारंपरिक शेती आणि नियमित पिकेही तितकीच महत्त्वाची आहेत, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world