बीडच्या भूमिपुत्राने ऑलिम्पिक गाजवलं; अविनाश देशाला गोल्ड मेडल मिळून देईल, वडिलांचा विश्वास 

अंतिम फेरीपूर्वी अविनाशच्या आई-वडिलांनी त्याच्या यशाचं कौतुक केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील भूमिपूत्र असलेल्या अविनाश साबळेनं (Avinash Sable) पॅरिस ऑलिम्पिकचं मैदान गाजवल असून अंतिम फेरीत धडक दिली आहे. अविनाश पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या (Paris Olympics) स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करीत आहे. या संपूर्ण स्पर्धेत अविनाशनं सातत्यपूर्ण कामगिरी करत स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक मारली. अशी कामगिरी करणारा अविनाश साबळे पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. आपला मुलगा देशाला गोल्ड मेडल मिळवून देईल असा विश्वास त्याचे वडील मुकुंद साबळे यांनी व्यक्त केलाय.

भारतीय वेळेनुसार आज रात्री दीड वाजता या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय धावपटू अविनाश साबळेने सोमवारी पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा साबळे हा भारतातील पहिला खेळाडू ठरला. आज अविनाश अंतिम फेरीत खेळणार आहे. आता अंतिम सामन्यात अविनाश कोणतं पदक मिळवतो? याकडेच कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागलं आहे.

नक्की वाचा - Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये भारत इतिहास रचणार, आणखी 7 मेडल मिळणार! पाहा कोण आहेत दावेदार?

अंतिम फेरीपूर्वी अविनाशच्या आई-वडिलांनी त्याच्या यशाचं कौतुक केलं. देशाला गोल्ड मेडल मिळवून देण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला गोल्ड मेडल मिळेल यावर अविनाशच्या आई-वडिलांचा विश्वास आहे. त्यांना प्रत्यक्षात लेकाचा सामना पाहण्याची इच्छा आहे. मात्र त्यांच्याकडे पासपोर्ट नाही. फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना घरात राहून टिव्हीवरच हा सामना पाहावा लागणार आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून तो खूप मेहनत घेत असल्याचंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.