बीडमध्ये मुंडे समर्थकांचा राडा; शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

बीडमध्ये परळी  विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड: महाराष्ट्रामध्ये आज २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. राज्यभरातील मतदान केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दुसरीकडे अनेक ठिकाणी राजकीय राडाही पाहायला मिळत आहे. अशातच बीडमध्ये परळी  विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  बीडच्या परळी मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला आहे. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड यांनी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण केलीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. माधव जाधव यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र पक्षाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली होती.

नक्की वाचा: राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार?  पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश 
 

उमेदवारीवरुन डावलल्यानंतरही जाधव यांनी संपूर्ण प्रचारा दरम्यान एकनिष्ठपणे पक्षाचे काम केले. आज मतदान प्रक्रियेवेळी माधव जाधव परळी शहरातील मतदान केंद्रास भेट देण्यासाठी गेले असता त्यांना ही मारहाण झाली. परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत देखील बोगस मतदान होत असल्याचा आरोप उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला होता. याचा व्हिडिओ देखील माध्यमांसमोर आणण्यात आला होता. अशातच आता राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना अशी मारहाण होताना दिसून येत आहे.

परळी विधानसभा मतदार संघात प्रशासनाच्या सहकार्याने बोगस मतदान होत आहे. तालुक्यातील धर्मापुरी मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बंद करण्यात आले असून महिलांना मतदान केले जाऊ देत नाही तसेच केलेले मतदान तपासले जात आहे, असा खळबळजनक आरोप शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. 

Advertisement

महत्वाची बातमी: बारामतीत अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी, शर्मिला पवारांचा आरोप