Parth Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असताना, दुसरीकडे मात्र राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळूनही पार्थ पवार पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे त्यांचे बंधू जय पवार या बैठकीला उपस्थित होते, मात्र पार्थ यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
नेमकी नाराजी कशामुळे?
राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पार्थ पवार यांना एखादे मोठे पद किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. त्यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी या निर्णयात काही बदल झाले का किंवा त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या पक्ष अध्यक्षपदाच्या निवडीसारख्या मोठ्या कौटुंबिक आणि राजकीय सोहळ्याच्या वेळी पार्थ यांचे तिथे नसणे अनेकांना खटकले आहे. यामुळेच त्यांच्या मनात काहीतरी सलत असल्याची चर्चा रंगली आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या नव्या 'बॉस' समोर 5 मोठी आव्हानं, प्रत्येक पायरीवर असेल कसोटीचा प्रसंग ! )
राज्यसभेचे गणित आणि पार्थ पवारांची एन्ट्री
प्रफुल पटेल यांनी माहिती दिली आहे की, 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या 7 जागांच्या निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील. राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे आणि राष्ट्रवादीकडे सध्या 40 आमदार आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांचा विजय ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.
पक्षाने त्यांना राज्याच्या राजकारणाऐवजी थेट केंद्राच्या राजकारणात प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अजित पवार यांच्यानंतर दिल्लीत पक्षाची बाजू मांडणारा एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal : पार्थिव समोर होतं आणि तुम्ही विलीनीकरण मागत होता?'; भुजबळांचा सवाल, NCP च्या बैठकीत सन्नाटा )
पार्थ पवारांची दुसरी इनिंग
पार्थ पवार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, परंतु तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी थेट निवडणूक न लढवता पडद्यामागून संघटनेचे काम करण्यावर भर दिला होता. आता राज्यसभेच्या माध्यमातून ते आपल्या राजकीय कारकिर्दीची दुसरी इनिंग सुरू करत आहेत. 16 मार्च रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर त्यांचा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाण्याचा मार्ग मोकळा होईल.