सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Charitable Hospital : शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दररोज कोट्यवधींचं दान अर्पण होत असताना साईबाबांच्या नावानं चालवण्यात येणाऱ्या साईनाथ धर्मादाय रुग्णालयात मात्र रुग्णसेवेची अक्षरशः परवड होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. स्वस्त उपचाराच्या आशेने आलेला रुग्ण उपचाराआधीच रांगेत दमतो आणि व्यवस्थेची उदासीनता त्याच्या वेदनांवर मीठ चोळत असल्याच विदारक चित्र दिसून येत आहे. राज्यभरातील गोरगरीबांचा आधार असलेलं शिर्डीचं साईनाथ रुग्णालय आज रुग्णसेवेपेक्षा रांगेसाठीच जास्त ओळखलं जातंय. केवळ केसपेपर काढण्यासाठी दोन ते अडीच तास रुग्णांना ताटकळत उभं राहावं लागतंय. वृद्ध, आजारी, अशक्त रुग्णांसाठी ही रांग म्हणजे एक शिक्षाच ठरतेय.
साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत दोन धर्मादाय रुग्णालये चालवली जातात. साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्णालय. अत्यंत अल्पदरात उपचार देणारं, द्वारावती धर्मशाळेजवळील साईनाथ रुग्णालय आज प्रशासनाच्या अपयशाचं जिवंत उदाहरण ठरतंय. साईनाथ रुग्णालयात तब्बल तीनशेहून अधिक कर्मचारी आणि पन्नासपेक्षा जास्त डॉक्टर कार्यरत आहेत. चार इमारतींमध्ये कार्यरत असलेल्या या रुग्णालयात लहानमोठ्या सर्व आजारांवर उपचार होतात. तरीही प्रत्यक्षात रुग्णसेवा रांगेच्या गराड्यात अडकलेली दिसतेय, ही गंभीर बाब आहे.
दहा रुपयांची वैद्यकीय सेवा आता ५० रुपयांवर
पूर्वी दहा रुपयांत मिळणारी वैद्यकीय सेवा आता पन्नास रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दुबार तपासणीसाठी पंचवीस रुपये आकारले जात आहेत. तरीही राज्यभरातून हजारो गरजू रुग्ण येथे येतात. कारण एकच, स्वस्त उपचार आणि साईबाबांवरील श्रद्धा. मात्र ही श्रद्धा आज व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे तुटतेय का? असा सवाल उपस्थित होतोय. सध्या रुग्ण नोंदणीसाठी केवळ पाच खिडक्या सुरू आहेत. दिवसभरात एक हजाराहून अधिक बाह्यरुग्ण नोंदणी होत असताना, या पाच खिडक्यांवरचा ताण प्रचंड आहे. परिणामी, केसपेपरसाठी रांग, डॉक्टर तपासणीसाठी रांग, चॅरिटी तपासणीसाठी रांग,मोफत औषधांसाठी रांग… असा अखंड रांगांचा प्रवास रुग्णांच्या नशिबी आलाय.
नक्की वाचा - Shirdi News: साईबाबांचे आता रांग न लावता मिळणार थेट दर्शन, करा फक्त एक काम, मिळेल झटपट दर्शन
संस्थानकडे कोट्यवधींचा निधी, मात्र कर्मचाऱ्यांची वानवा
“साईबाबांच्या दवाखान्यात गुण पडतो, बाहेर पडवत नाही, येथे स्वस्तात सर्व उपचार होतात, औषध मोफत मिळतात म्हणून लांबून आलो, पण केसपेपर काढण्यासाठी दोन तास लागल्यांचा खंत” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक रुग्ण व्यक्त करत आहेत. उपचार स्वस्त असले तरी वेळेची, आरोग्याची आणि माणुसकीची किंमत इथे मोजावी लागतेय. साईबाबा संस्थानकडे कोट्यवधींचा आरोग्य निधी असताना, पुरेसे कर्मचारी का भरले जात नाहीत? नोंदणी खिडक्यांची संख्या वाढवली जात नाही का? वृद्ध आणि गंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था का नाही? आज सर्वत्र हायटेक सुविधा असताना एका क्लिकवर संबंधित विभागाकडे ऑर्डर पाठवली जाऊ शकते मात्र येथे रांगेचा फार्स का?
हे प्रश्न आता केवळ रुग्णांचे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेवरचे आरोप ठरत आहेत.
साईबाबांचा “सबका मालिक एक” हा संदेश देणाऱ्या संस्थानानं आता “सबका इलाज वेळेत” हा वसा प्रत्यक्षात उतरवणं गरजेचं आहे. अन्यथा, कोट्यवधींच्या दानाच्या सावलीत रुग्णांची होणारी ही फरफट साईबाबांच्या सेवेला तडा देणारा ठरेल, हे प्रशासनानं वेळीच ओळखायला हवं.