राकेश गुडेकर, रत्नागिरी
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची काही दिवसांपूर्वीच लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
शहराजवळच्या चंपक मैदान येथे ही घटना घडली. तरुणी घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तरुणीवर अत्याचार करणारा व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
(नक्की वाचा- हुंडा, संशय... पतीच्या जाचाला कंटाळून डॉक्टर पत्नीने संपवलं जीवन; अखेरचं पत्र वाचून सर्वांनाच अश्रू अनावर)
या घटनेनंतर शहरासह जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले होते. सोमवारी संध्याकाळी रत्नागिरीकरांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाबाहेर रास्ता रोको केला. तर जिल्हा रूग्णालय, मनोरूग्णालयातील नर्सेससह पुरूष कर्मचाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयाबाहेर एकत्र येत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मोठ्या संख्येने नागरिकही रुग्णालयात दाखल झाले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 64 (1) नुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल केला आहे.
(नक्की वाचा- 'मिठी मारली, चुंबन घेतलं'... मल्याळम अभिनेत्रीनं सांगितला लैंगिक छळाचा अनुभव, दिग्गजांवर केले आरोप)
संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
जिल्हा रूग्णालयाबाहेर संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांनी आंदोलकांची समजूत काढताना सांगितलं की आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असून लवकरच गुन्हेगाराला अटक करू. आम्ही इथेच गुंतून राहिलो तर त्याचा परिणाम तपासावर होईल, असं सांगताच आंदोलकांनी पोलिसांना 24 तासांची मुदत देत रास्ता रोको मागे घेतला. दरम्यान आमदार राजन साळवी यांनी देखील पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले.