'महाराष्ट्राने काँग्रेसच्या प्रकोपाला,पापाला अनेक वर्ष सहन केले. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाचे मुळ काँग्रेस आहे. काँग्रेसने कधीही इथल्या शेतकऱ्यांच्या सुख दुखाची पर्वा केली नाही,' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. नांदेडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लबाड लांडग्यांचा कळप असा उल्लेख करत मविआच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
"आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या समर्थनासाठी एक लाट सुरु आहे. प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य आहे, भाजप, महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे. आज देश विकसित भारतासोबत पुढे वाटचाल करत आहे. हे ध्येय गाठण्यासाठी भाजप आणि त्यांचे सहकारीच गंभीरपणे काम करत आहे. म्हणूनच भाजप आणि एनडीएलाच लोक पुन्हा पुन्हा निवडून देत आहेत,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
'मी डबल ड्युटी करतोय..'
जनतेने भाजप एनडीएला तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. मात्र यावेळी त्यामध्ये नांदेडचे फुल नव्हते. यावेळी नांदेडचे फुलही दिल्लीला पोहोचेल.मी आज डबल ड्युटी करत आहे. एकीकडे मी मोदीसाठीही मदत मागतोय आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठीही तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. मी दोन दिवसांपासून महाराष्ट्रात जिथे जिथे जातोय. प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मनात एक सल आहे. लोकसभेत कमतरता राहिली ती विधानसभेला पुर्ण करायची आहे.लोक म्हणत आहेत विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीचे सरकार पाहिजे.महाराष्ट्राने काँग्रेसच्या प्रकोपाला, पापाला अनेक वर्ष सहन केले. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाचे मुळ काँग्रेस आहे.काँग्रेसने कधीही इथल्या शेतकऱ्यांच्या सुख दुखाची पर्वा केली नाही.असा घणाघातही पंतप्रधान मोदींनी केला.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला तसेच पंतप्रधान मोदींचेही तोंडभरुन कौतुक केले. संकल्प आणि सिद्धीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी, विचार आणि विकासाचे एकसुत्र म्हणजे नरेंद्र मोदी. गती आणि प्रगतीचा संगम म्हणजे नरेंद्र मोदी. महाराष्ट्राच्य सर्वांगिण विकासासाठी मोदीजींनी नेहमी सहकार्य केले, ताकद दिली. असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या फेक नॅरेटिव्हला फेकून देत सत्याला विजय मिळवून दिला. अशीच सत्य असत्याची लढाई महाराष्ट्रात सुरु झाली आहे. खोटारड्या,थापाड्या,लबाड लांडग्यांचा कळप तयार झाला आहे. त्यांना आपल्याला चारीमुंड्या चित करायच आहे, असा टोला त्यांनी लगावला.