Ajni pune Vande Bharat Express: विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आज उद्घाटन झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे ते नागपूर हे अंतर आता केवळ 9 तासांत पार होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नगर ते पुणे रेल्वेही सुरु होणार असल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
"आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना विनंती केली होती. नागपूर ते पुणे प्रचंड ट्रॅफिक आहे. त्यामुळे एक वंदेभारत एक्सप्रेस सुरु केली पाहिजे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आज नागपूर- पुणे वंदे भारत ट्रेन सुरु होत आहे. हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. अतिशय वेगाने आणि चांगल्या सोईयुक्त नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना यामधून प्रवास करता येणार आहे. केवळ १२ तासात हा प्रवास होईल. या वंदेभारत ट्रेनसाठी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.
"आत्ता नगरवरुन ट्रेन दौंडला जाते आणि दौंडवरुन पुण्याला जाते. त्यामुळे मी नगरवरुन थेट पुण्यासाठी रेल्वे असावी असे मी सूचवले आहे. पुढच्या काळात त्यासंदर्भात निर्णय होईल. संभाजी नगर ते अहिल्यानगर ते पुणे हा नवीन एक्सप्रेस वे करत आहोत.. त्या बाजूने रेल्वे मार्ग केल्यास नागपूर ते पुणे अंतर शंभर किमीपेक्षा अधिक अंतर कमी होऊ शकते. त्याकडे लक्ष घालून आम्ही रेल्वेसोबत बोलण्याचे काम करत आहोत. त्यांनी एक आढावा केली आहे. पण आमची जमीन अधिग्रहण आधीच होत आहे, त्यामुळे आमचे अधिग्रहण रेल्वेने स्वीकारावे त्याद्वारे नव्याने जमीन अधिग्रहण करावी लागणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नक्की वाचा - Vande Bharat Train : पुणे-नागपूरसह वैष्णो देवीलाही जाणं सोपं होणार; तिकीट दर, वेळ वाचा सर्वकाही