
New Vande Bharat Express : देशभरात तीन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवार 10 ऑगस्ट रोजी या नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवतील. यामध्ये बंगळुरू-बेळगाव वंदे भारत, वैष्णो देवी कटरा-अमृतसर वंदे भारत आणि नागपूर(अजनी)-पुणे वंदे भारत यांचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारत ट्रेनमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे कटरा वंदे भारत ट्रेनमधून वैष्णो देवी मंदिरात येणं-जाणं सोपं होणार आहे. याशिवाय रेल्वेने पहिल्यांदा काश्मीर घाटीपर्यंत मालगाडी पोहोचवून नवा इतिहास रचला आहे.
या नव्या वंदे भारत ट्रेनमुळे कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन आणि आर्थिक बाजू अधिक भक्कम होण्यास मदत होईल. कर्नाटकात वंदे भारत ट्रेनची संख्या आता 11 (22 सेवा) होईल. जम्मू काश्मीरमध्ये वंदे भारत ट्रेनची संख्या वाढून 5 (10 सेवा) होईल. याप्रकारे पंजाबमध्ये आता एकूण पाच वंदे भारत ट्रेन धावतील, ज्यामुळे दहा सेवा मिळू शकतील. (Bengaluru-Belgaum Vande Bharat, Vaishno Devi Katra-Amritsar Vande Bharat and Nagpur(Ajni)-Pune Vande Bharat)
नक्की वाचा - आता रेल्वे तिकिटाच्या दरापेक्षा कमी पैसे मोजावे लागणार, भारतीय रेल्वेची जबरदस्त ऑफर
नव्या वंदे भारत ट्रेन आणि प्रमुख स्टेशन
KSRबंगळुरू-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस
प्रमुख स्टेशन: बंगळुरू, धारवाड़, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकुर आणि यशवंतपुर, बेळगाव.
नागपुर (अजनी)–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस
प्रमुख स्टेशन: पुणे, वर्धा, बडनेरा, शेगांव, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, दौंड, नागपुर.
वंदे भारत ट्रेनचा मार्ग आणि थांबे
नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी 9.50 वाजता सुटेल आणि रात्री 9.50 वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन चालणार नाही पुण्याहून ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता सुटून, संध्याकाळी 6.25 वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
प्रवासाचे भाडे किती असणार?
प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार ही ट्रेन स्लीपर वंदे भारत असावी अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या ही सेवा एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. एसी चेअर कारचे भाडे सुमारे 1500 रुपये तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 3500 रुपये असणार आहे. 10 ऑगस्ट रोजी उद्घाटनानंतर, 14 ऑगस्टपासून वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा सुरू होईल.
वैष्णो देवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेस
प्रमुख स्टेशन: कटरा, जम्मू तवी, पठानकोट, जालंधर शहर, अमृतसर.
तिकीट किती असेल?
मिळालेल्या माहितीनुसार, ही वंदे भारत अमृतसर ते कटरपर्यंतचा प्रवास चार ते पाच तासात पूर्ण करेल. ही ट्रेन मंगळवार सोडून आठवड्यात सहा दिवस धावेल. या ट्रेनला एकूण सहा डब्बे असतील. ट्रेनचं भाडं एक हजार रुपये ते 1100 रुपयांपर्यंत असल्याची अपेक्षा आहे.
वंदे भारत ट्रेनची खासियत...
सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी अधिक काळजी घेण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये फोल्डेबल स्नॅक्स टेबल, मोबाइल चार्जिंग पोर्ट, आरामदायी सीट्स, आधुनिक टॉयलेट आणि इन्फोटेनमेंट सारख्या सुविधा देखील आहेत. प्रत्येक कोचमध्ये जीपीएस आधारित रिअल-टाइम ट्रॅकिंग सिस्टम आहे, जी प्रवाशांना येणाऱ्या स्टेशन, वेग आणि स्थानाबद्दल माहिती देते.
काश्मीर खोऱ्यातील विकासाला नवी दिशा...
पहिल्यांदाच पंजाबच्या रुपनगरमधून काश्मीर खोऱ्यातील अनंतनागपर्यंत मालगाडी पोहोचली आहे. काश्मीर खोऱ्याला राष्ट्रीय रेल नेटवर्कशी जोडण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊस आहे. ही मालगाडी १८ तासांपेक्षा कमी वेळात सुमारे ६०० किमी अंतर कापून अनंतनागला पोहोचली. ही मालगाडी सिमेंट घेऊन खोऱ्यात पोहोचली. यामुळे काश्मीर खोऱ्यातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये याचा वापर केला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world