Pune Municiple Corporation Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप, महायुतीने बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचा धडाका लावला आहे. कल्याण डोंबिवली, ठाण्यात अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर आता पुण्यातही भारतीय जनता पक्षाने खाते उघडले आहे. मतदानाआधीच पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पुण्यात भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध
राज्याचे राजकीय लक्ष लागून राहिलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच आपले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी माणिक बाग) मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणुकीच्या औपचारिक मतदानापूर्वीच पक्षाने पुण्यात आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे.
प्रभाग ३५ मध्ये एकूण ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाननी प्रक्रियेत दोन अर्ज बाद झाले, तर उर्वरित तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने मंजुषा नागपुरे यांचा मार्ग सुकर झाला. विशेष म्हणजे, नागपुरे आणि जगताप या दोन्ही उमेदवारांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत आपली 'हॅटट्रिक' पूर्ण केली आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप शहराध्यक्षांच्या कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.
विजयी उमेदवारांचे स्वागत
पुणे महापालिकेत यंदा भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची सत्ता काबीज करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असतानाच, भाजपने बिनविरोध विजयाचा सपाटा लावून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.