
मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/ ११ दहशतवादी हल्ल्यात आपल्या शौर्याने लढत वीरमरण पत्करलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या कन्येला अखेर राज्य प्रशासनात सन्मानाने स्थान मिळाले आहे. शहीद प्रकाश मोरे यांच्या कन्या अनुष्का प्रकाश मोरे यांची अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Grounds) राज्य प्रशासकीय सेवेत औषध निर्माता गट ब (Pharmacist Group B) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुष्का मोरे यांनी बी. फार्मसी (B. Pharmacy) हे शिक्षण पूर्ण केले आहे. अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीसाठी त्या पात्र असताना, औषध निर्माता गट ब हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यकक्षेत येते. या पदावर अनुकंपा तत्त्वावर थेट नियुक्ती देण्यासाठी नियमांचे बंधन होते. मात्र, शहीद कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी MPSC ने त्यांच्या विशेष नियमांमध्ये शिथिलता (Relaxation) दर्शवत, श्रीमती अनुष्का मोरे यांना 'एक विशेष बाब' (Special Case) म्हणून या पदावर नियुक्ती देण्यास सहमती दिली.
राज्य रोजगार मेळावा !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 4, 2025
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते आणि मा. उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृह येथे आयोजित राज्य रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिलो.
या… pic.twitter.com/UPO7XgoDqH
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शहीद कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. श्रीमती अनुष्का मोरे यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग, मंत्रालय मुंबई शहर येथे आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये खुला गट (Open Category) मधून करण्यात आली आहे.
दरम्यान, शहीद पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांनी २६/११ च्या हल्ल्यात आतंकवाद्यांशी धैर्याने प्रतिकार करत असताना आपले प्राण गमावले होते. त्यांच्या या सर्वोच्च त्यागाला शासनाने दिलेल्या सन्मानाचे हे एक प्रतीक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world