Akola News: अकोला महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी; बंडखोरांची नवी आघाडी पक्षासाठी ठरणार डोकेदुखी

Akola News: भाजपमध्ये सध्या दोन स्पष्ट गट असल्याचे चित्र आहे. एक गट माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांचा मानला जातो.

जाहिरात
Read Time: 3 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ऐन निवडणुकीत भाजपसमोर कठीण आव्हान देण्यात आले आहे. अकोला महापालिका निवडणूक लढण्यासाठी सर्वाधिक इच्छुक भाजपमध्येच असल्याने उमेदवारी वाटपाचा मोठा ताण पक्ष नेतृत्वावर आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे नाराजी, असंतोष आणि बंडखोरी रोखणे हे भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. याच दरम्यान भाजपमधील नाराज गटाने वेगळी चूल मांडत मतदारांना तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; भाजपचा नाराज गट एकत्र

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये एक नाराज गट सक्रिय आहे. पक्षांत आपल्याला दुर्लक्षित व डावलले जात असल्याचा आरोप हा गट सातत्याने करत आहे. या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी प्रदेश स्तरावरूनही प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील सर्व नाराज, तसेच उमेदवारी न मिळणाऱ्या इच्छुकांना एकत्र आणून स्वतंत्र आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून मतदारांना तिसरा पर्याय देण्याची रणनीती आखली जात असून, यामुळे सत्ताधारी भाजपच्या मतांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(नक्की वाचा-  Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर)

माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील समर्थक बंडखोरांची हालचाल

भाजपमध्ये सध्या दोन स्पष्ट गट असल्याचे चित्र आहे. एक गट माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांचा मानला जातो. तर दुसरा गट माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा आहे. डॉ. रणजित पाटील समर्थक असलेल्या बंडखोर नेत्यांनी आता नवी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. रणजित पाटील यांचे पुतणे आणि सलग दोन वेळा नगरसेवक राहिलेले आशिष पवित्रकार यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी आकार घेत असून, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी आणि माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांचा या आघाडीत समावेश आहे. या संदर्भात शहरातील ‘बंधन लॉन' येथे सहविचार सभा पार पडली. या सभेला भाजपमधील अनेक नाराज नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)

भूतकाळातील बंडखोरीचा भाजपला फटका

यापूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपमधील बंडखोरीचा मोठा फटका पक्षाला बसला होता. शहरातील ज्येष्ठ नेते हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत तब्बल 21 हजारांहून अधिक मते मिळवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांचा अवघ्या 1283 मतांनी पराभव झाला आणि तब्बल तीन दशकानंतर भाजपचा बालेकिल्ला आणि गळ ढासळला. काँग्रेसच्या पायथ्याशी पडला आणि काँग्रेसचे अकोला पश्चिम आमदार साजिद खान पठाण निवडून आले. तसेच माजी महानगराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे यांनीही अपक्ष म्हणून 2100 मते घेतली होती. या बंडखोरीनंतर भाजपने हरीश आलिमचंदानी, आशिष पवित्रकार आणि डॉ. अशोक ओळंबे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता हेच सर्व नाराज व बंडखोर नेते पुन्हा एकत्र येत भाजपसमोर मोठे आव्हान उभे करत आहेत. लवकरच या नव्या आघाडीचे नाव आणि स्वरूप जाहीर होणार असून, अकोला महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

Topics mentioned in this article