गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे पोषण आणि आरोग्य जपून एक सुदृढ पुढील पिढी घडवणे, तसेच मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मकता वाढवणे, या दुहेरी उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिला व बालविकास विभागामार्फत राज्यभर राबवली जात आहे. ही योजना मातांचे आरोग्य, कुटुंबाचा आनंद आणि समाजाचा विकास साधण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
नक्की वाचा: एलआयसीमध्ये बंपर भरती! तब्बल 92,000 पगार; कुठे अन् कसा कराल अर्ज?
या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांमार्फत केली जाते. केंद्र सरकारने 2025-26 या वर्षासाठी देशभरात 5 लाख 70 हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.
मातृ वंदना योजनेअंतर्गत किती रक्कम मिळणार?
- ही योजना पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत देते
- पहिल्या अपत्यासाठी: एकूण ₹5,000 चा लाभ मिळतो
- गर्भधारणेची नोंदणी झाल्यानंतर आणि सहा महिन्यांच्या आत प्रसूतीपूर्व तपासणी झाल्यावर ₹3,000 दिले जातात.
- बाळाच्या जन्माची नोंदणी झाल्यावर आणि त्याला 14 आठवड्यांपर्यंतची सर्व आवश्यक लस दिल्यानंतर ₹2,000 मिळतात.
- दुसऱ्या अपत्यासाठी विशेष प्रोत्साहन म्हणून ₹6,000 ची अतिरिक्त रक्कम दिली जाते. ही रक्कम मुलीच्या जन्मानंतर एकाच हप्त्यात दिली जाते.
मातृ वंदना योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत?
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाख पेक्षा कमी आहे.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील महिला.
- 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या महिला.
- बीपीएल शिधापत्रिकाधारक.
- आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी.
- ई-श्रम कार्ड धारक.
- किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी.
- मनरेगा जॉब कार्ड धारक.
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, किंवा आशा कार्यकर्ती.
- अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशनिंग कार्डधारक.
अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधावा. तसेच, तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊनही अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी, या केंद्रांवर संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची यादी आणि अर्ज प्रक्रिया समजून घेता येते.
नक्की वाचा: हार्वर्ड विद्यापीठातून 7 महत्वाचे कोर्स फुकटात करण्याची संधी; कसा आणि कुठे कराल अर्ज?
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत 36 जिल्ह्यांचे जिल्हा नोडल अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरच्या मुख्य सेविकांचे मॅपिंग 100 टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षासाठी 40 हजार नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित उद्दीष्ट लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 2025-26 वर्षासाठी 5 लाख 70 हजार उद्दिष्ट दिले असून, ते कालमर्यादेत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी योजनेअंतर्गत असेलल्या नियमांची पूर्तता आणि प्रलंबित महिला लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच 2017 पासून ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आल्या नाहीत, अशा महिलांपर्यंत अंगणवाडी महिला अथवा आशा वर्कर यांच्या सहायाने लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.