दिवंगत काँग्रेस खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पक्षांअंतर्गत विरोधामुळे नवऱ्याचा जीव गेला परंतू माझा जाऊ देणार नाही म्हणत त्यांनी नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. धानोरकरांनी केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसमधील गटातटाचं राजकारण बाहेर आल्याची चर्चा आहेत.
काय आहे प्रकरण?
चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर यांचा 2023 च्या मे महिन्यात 'सेप्टिसेमिया' या आजारामुळे अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर सुरेश धानोरकरांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी खासदारकीवर दावा केला आहे. काँग्रेसच्या परंपरेनुसार, एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला संधी दिली जाते. त्याशिवाय मतदारसंघात माझा जनसंपर्क चांगला असल्याचा सांगत प्रतिभा धानोरकरांनी खासदारकीवर दावा केला आहे.
उमेदवारी मिळविण्यासाठी शिवानी वडेट्टीवार यांची सुरु असलेल्या पायपिटी पाहता आमदार धानोरकर यांनी एका वाक्यात समाचार घेतला.'शिवानी माझी प्रतिस्पर्धक नाही. ती लोकसभेचा उमेदवार नाही, असे सांगत आमदार धानोरकर यांनी शिवानीची हवा काढली. पुढे धानोरकर म्हणाल्या,'आपली ताकद दाखविल्याने कुणाला तिकीट मिळत नाही. कुणी दिल्लीला गेले आणि तिकीट मागितलं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. पक्षश्रेष्ठी ज्यांना तिकीट देईल त्यांच्या सोबत आम्ही असू. मी काँग्रेसच्याच तिकीटावर लोकसभा लढवणार यावर प्रतिभा धानोरकर ठाम आहेत.
प्रतिभा धानोरकरांचा मोठा आरोप
पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला. तिच माणसं माझ्याही मागे लागले आहेत. मात्र एक जीव गेला, दुसरा जाऊ देणार नाही, असं सांगत प्रतिभा धानोरकरांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्याच पक्षातील काही लोकांकडून माझा विरोध केला जात आहे. मात्र तरीही मी भाजपमध्ये जाणार नाही. मी काँग्रेसची आणि काँग्रेसमधूनच लोकसभा निवडणूक लढवणार, यावर धानोरकर ठाम आहेत. दावेदारी कोणीही केली तरी यावर पहिला हक्क माझा आहे.
आताही आमच्या पक्षात काही भाजपच्या पे रोलवर चालणारी माणसं आहेत. ते सूचनेचं पालन करतात. मात्र मी काँग्रेसच्या खासदाराची बायको आणि मी निवडणूक काँग्रेसच्याच तिकीटावर लढणार आहे. माझ्याविरोधात चुकीच्या बातम्या दिल्या जात आहे, असंही धानोरकर यावेळी म्हणाल्या.