मेहबूब जमादार, प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या महामार्गांवरील (Mumbai Pune old highway) रायगडातील बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ काल मोठी दरड कोसळली होती. या दरडीत मंदिरातील दोन पुजाऱ्यांचं राहतं घरही कोसळलं. या दोन्ही पुजाऱ्यांच्या तत्काळ लक्षात आल्यामुळे ते वेळीत बाहेर पडले. यामळे दोघांचा जीव बचावला. राज्यातील अनेक भागात गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच घाटमाथ्यावरील बोरघाटातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने शिंग्रोबा मंदिरासमोरील रस्त्याच्या बाजूला मोठी दरड कोसळली.
शिंग्रोबा मंदिरातील पुजारी यांचे राहते घर खाली आले. पक्क बांधकाम असलेल्या दोन छोट्या खोल्या आणि एक शेड कोसळली आहे. मात्र शिंग्रोबा देवाच्या कृपने पडण्या अगोदर पुजाऱ्यांच्या हे लक्षात आल्याने ते तात्काळ बाहेर पडले आणि क्षणात हे घर कोसळले.
नक्की वाचा - C. Sambhajinagar : आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात
गेल्या अनेक वर्षांपासून बोरघाटात वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचे मंदिर आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गवरून बोरघाटातून जाताना प्रत्येक वाहन चालक आपले वाहन थांबवून शिंग्रोबा देवाला नतमस्तक होऊनच पुढे जातो. याच मंदिरातील पुजारी गेल्या अनेक वर्षांपासून इथं राहत होते. परंतु या मुसळधार पावसात मोठी दरड कोसळल्याने ते जमिनदोस्त झाले. ही दरड कोसळल्याने त्याच्या लगत असणारा राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाला भेगा पडल्या आहेत. रस्ता ही खचण्याची भीती व्यक्त होत आहे. MSRDC व IRB प्रशासनाने या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन उपाय योजना करण्याची गरज आहे. अन्यथा बोरघाटही खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.