मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शनिवारी, 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प हाती घेतलाय. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून हा प्रकल्प झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानच्या प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत ठाणे ते बोरिवलीदरम्यान ये - जा करणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांमुळे या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होताना दिसतो. हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत ठाणे ते बोरिवली यादरम्यान दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गाचे बांधकाम झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून वेळेची बचत होणार आहे.
ठाणे ते बोरिवली यादरम्यान बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला 16 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वन्यजीव मंजुरी देण्यात आली आहे. तर 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर होऊ शकणाऱ्या या प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, वन्यजीव मंजुरीबरोबरच 8 फेब्रुवारी 2023 रोजी प्रादेशिक सक्षमीकरण समितीच्या बैठकीत वन वळवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यातील प्रथम टप्प्याचे अनुपालन पूर्ण झाले आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून 19 जून 2024 रोजी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून 24 जून 2024 रोजी प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. एपीसीसीएफ गोराई यांच्या कामाची परवानगी घेण्यात येत आहे. तर अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक यांनी 26 जून 2024 रोजी कामाची परवानगी दिली आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचे फायदा
- पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता
- पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल.
- पश्चिम उपनगरातून नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वेगाने गाठता येईल
- नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा होईल.
- जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे 8.80 किलोमीटरने कमी होईल.
- गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी 75 मिनिटांवरून सुमारे 25 मिनिटे होईल.