
तेजस मोहतुरे, गोंदिया
मोबईलाचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध येथे ही घटना घडली आहे. बाईकवर जाताना मोबाईल फोनचा स्फोट झाला.
सुरेश भिकाजी संग्रामे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. या स्फोटात गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सुरेश संग्रामे कुरखेडा तालुक्यातील कसारी जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. सुरेश संग्रामे यांच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा स्फोट होऊन कपड्याला आग लागली. त्या आगीत भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाईकवर मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
मृत सुरेश भिकाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज/वडसा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आहे.
मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
- मोबाईल ओव्हरचार्ज करणे धोकादायक ठरु शकतो. रात्रभर मोबाईल चार्जिंग केल्याने ओव्हरहिट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्फोट होऊ शकतो.
- मोबाईल फोन ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीच्या चार्जरने तो चार्ज करावा.
- मोबाईल चार्जिंस सुरू असताना फोनवर बोलणे टाळा. व्हिडीओ पाहणे किंवा गेम खेळणे टाळा.
- फोन वारंवार गरम होत असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये तपासून घ्या.
- अनावश्यक किंवा हेव्ही अॅपमुळे फोन आणि बॅटरीवर लोड येऊ शकतो. त्यामुळे फोन गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते.
- मोबाईल फोनचं कव्हर देखील स्फोटाचं कारण ठरु शकते. फोनचं कव्हर जास्त जाड नसावं. कव्हर जाड असेल तर उष्णता बाहेर पडण्यास अडचण होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world