दिनेश कुलकर्णी, हिंगोली
महाराष्ट्र एकीकडे वेगाने प्रगती करत असताना राज्यात अशीही काही गावे आहेत जिथे आजही नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी झगडावं लागत आहे. अनेक गावांमध्ये रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यांअभावी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं देखील अनेकदा समोर आलं आहे. अशीच परिस्थिती हिंगोलीच्या कलागाव येथील नागरिकांची आहे. रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलं असल्याने येथील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडे थेट हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कलगाव ते भांडेगावमार्गे जाणाऱ्या पांदण रस्त्याच काम अनेक वर्षापासून रखडलं आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कलगावच्या नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची अजब मागणी केली आहे.
निवेदनात काय म्हटलंय?
"मौजे कलगाव ते भांडेगाव हा तीन ते चार किलोमीटर पांदण रस्ता आहे. त्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे. 90 टक्के शेतकऱ्यांची संमती असताना काही राजकीय लोकांच्या दबावाखाली व द्वेषापोटी काम बंद पाडण्याचे पाप काही लोकांनी केले आहे. आज रोजी शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी कसे शेतात जावे व कसे काम करावे व पिके कसे जोपासावे. तसेच मौजे कलगाव या गावातून आठवी ते बारावीचे विद्यार्थांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे."
(नक्की वाचा- लाडकी बहीणीची फरफट, अर्ज भरताना ना-ना अडचणी)
"तसेच कलगाव या गावातील नागरिकांना आरोग्य केंद्र, ढोर दवाखाना हे भांडेगावला आहेत. तसेच पशु वैद्यकीय दवाखाना देखील भांडेगाव येथेच आहे. यामुळे देखील खुप अडचण निर्माण होत आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हाधिकारी साहेबांनी एकतर हा रस्ता संबंधीत सर्व विभागाला सांगून सुरु करुन दयावा. अन्यता आम्हा सर्व शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची व्यवस्था करुन द्यावी. आम्ही सर्व शेतकऱ्यांना लक्षवेधी आंदोलन करावे लागेल, याची सर्वस्व जवाबदारी हिंगोली प्रशासनाची असेल, याची नोंद घ्यावी", असं या निवेदनात म्हटलं आहे.