Unique IAS IPS Couple Story: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र गृह विभागाने एकाचवेळी तब्बल 96 वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. या आदेशानुसार सोलापूरच्या नव्या पोलीस उपायुक्त म्हणून २०२२ च्या बॅचच्या आयपीएस (IPS) अधिकारी वृष्टी जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वृष्टी जैन यांचे पती कुशल जैन हे आधीपासूनच सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे आता सोलापूरचा प्रशासकीय आणि पोलीस विभागाचा कारभार पती-पत्नीच्या हातात असणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापुरच्या नव्या पोलीस उपायुक्त म्हणून IPS अधिकारी वृष्टी यांची नियुक्ती झाली आहे. दुसरीकडे त्यांचे पती कुशल हे आधीपासूनच जिल्हा परिषदेचे CEO म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता पती-पत्नी सांभाळणार आहेत. एकाच जिल्ह्यात दोघेही महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याने या अधिकारी दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोण आहेत वृष्टी जैन?
वृष्टी जैन या महाराष्ट्र केडरच्या २०२२ बॅचच्या भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. त्या UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे थेट भरती (RR) म्हणून रुजू झाल्या. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे अप्पर पोलीस अधीक्षक (ASP) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. गृह विभागातील त्यांच्या सेवाकाळाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा विचार करून आता त्यांच्याकडे सोलापूर शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोण आहेत कुशल जैन?
कुशल जैन हे २०२२च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून ४०वा क्रमांक पटकावला होता. ते मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (ITDP) प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर त्यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली.
दरम्यान, प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेतील दोन अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशिल पदे आता एकाच घरात आणि तेही एकाच अधिकारी दाम्पत्याकडे आल्यामुळे सोलापूरच्या वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. कुशल जैन यांच्याकडे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची, तर वृष्टी जैन यांच्याकडे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा असणार आहे. एकाच जिल्ह्यात पती-पत्नी उच्च पदांवर कार्यरत राहून प्रशासनाचा गाडा हाकणार असल्याने या सनदी अधिकारी दाम्पत्याचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
Success Story: अमरावतीच्या लेकीची 'किमया', 12वी परीक्षेत केली कमाल; सर्व विषयात...