सुरज कसबे, पुणे:
Pune BJP Vs Congress Clash: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे, असं ते म्हणाले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा राज्यभर निषेध केला जात असून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अशातच पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले असून आंदोलनावेळी दगडफेकीची घटना घडली आहे.
पुण्यात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने
समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात काँग्रेस भवनासमोर निषेध आंदोलन केले. या आंदोलनाला प्रत्यूत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्याचे सांगण्यात येत आहे.
Pune News: हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरुन वाद! भाजप आक्रमक; पुण्यात गुन्हा दाखल
यावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजचा दिवस हा वाईट दिवस आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आमच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आली. महापौर फक्त तमाशा बघत होत्या, पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी केला आहे.
अकोल्यातही आंदोलन..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अकोल्यात भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. नवीन बस स्टँडसमोर झालेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यादरम्यान प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर हे आंदोलन भाजप महानगर सरचिटणीस ॲड. देवाशीष काकड यांच्या नेतृत्वात पार पडले. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world