अविनाश पवार, पुणे:
Pune News: एकीकडे महानगर पालिका निवडणुकांचे धुमशान सुरु असतानाच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील काकडे वस्ती, गल्ली क्रमांक २ येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या ठिकाणावर पुणे पोलिसांनी मोठी प्रतिबंधक कारवाई केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (२५ डिसेंबर) मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही धडक कारवाई केली.
पुण्यात मोठी कारवाई...!
कारवाईदरम्यान घटनास्थळावर विविध प्रकारच्या अवैध दारूचा साठा आढळून आला. यामध्ये व्हिस्की, रम, बिअर तसेच देशी दारूचा समावेश होता. कॅन आणि पिशव्यांमधून सुमारे ७० लिटर दारू जप्त करण्यात आली असून, या साठ्याची अंदाजे किंमत सुमारे २ लाख ते ३.५ लाख रुपयांदरम्यान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यानंतर पोलिसांनी आरोपींच्या निवासस्थानी झडती घेतली असता, शयनकक्षातील कपाटामध्ये लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली.
Pune News: एसी हवाय तर जास्त पैसे द्या! Rapido चालकाची दादागिरी
कपाटातील वेगवेगळ्या कप्प्यांमधून सविस्तर पंचनामा करून एकूण १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम अंदाजे १.०४ ते १.०८ कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अवैध दारू विक्रीत सहभागी असल्याच्या आरोपावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अमर कौर (उर्फ माद्रीकौर दादासिंग जन्नी), दिलदार सिंग दादासिंग जन्नी, देवाश्री जन्नी सिंग यांचा समावेश आहे.
तिघांविरोधात गुन्हा दाखल...
या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), दारूबंदी कायदा तसेच अन्य लागू कायद्यांच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अवैध दारूचा नेमका स्रोत कोणता आहे, जप्त रोख रकमेचा उगम काय आहे आणि हा अवैध व्यवसाय किती मोठ्या नेटवर्कमध्ये चालतो, याचा शोध घेतला जात आहे.
नक्की वाचा: प्रवासाला निघण्यापूर्वी ही बातमी वाचा! 26 डिसेंबरपासून रेल्वे तिकीटाचे दर वाढणार, वाचा सविस्तर