अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune News: पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री सुरू असलेल्या कॉपर केबल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाचेही नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यामध्ये केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील BSNL कॉपर केबल चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री सुरू असलेल्या कॉपर केबल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पर्दाफाश केला आहे. ड्रेनेज लाईनचे झाकण उघडून बीएसएनएलच्या भूमिगत मौल्यवान कॉपर केबल्स क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
या धडक कारवाईत तब्बल ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये पुण्यातील राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाचाही समावेश आहे. प्रविण बागुल असे या आरोपीचे नाव असून तो वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी आहे. तो वंचितच्या झोपडपट्टी सुरक्षा समितीचा पुणे शहराध्यक्ष आहे.
आरोपींमध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्याचा समावेश
अस्लम सगीर खान, आरिफ कुंदुखाँ खान (वय ४०, रा. उत्तरप्रदेश), शोहेब हारुण खान (वय २५, रा. उत्तरप्रदेश), सलमान इद्रीस मलिक (वय ३३, रा. दिल्ली), नरेश कुमार श्रीशिवचरण (वय ४३, रा. हरियाणा), नवी मोहम्मद शान मोहम्मद (वय ३५, रा. उत्तरप्रदेश), अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन (वय २२, रा. हडपसर, पुणे), अफाक अन्सारी रफिक अन्सारी (वय २२, रा. हडपसर, पुणे) आणि प्रवीण दादासाहेब बागुल (वय ३३, रा. हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.