यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune IED Bomb CCTV Footage: पुणे शहरामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील हडपसर येथील कामधेनु इस्टेटमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ झाली. सुदैवाने, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) ही वस्तू यशस्वीरित्या निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आता हा बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ
समोर आलेल्या माहितीनुसार,पुण्यातील कामधेनु इस्टेट परिसरातील उषा किरण हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी ७ च्या सुमारास एक संशयास्पद बॉक्स आढळून आला. ही माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच तातडीने हडपसर पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री ८ वाजता पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि एटीएसचे (ATS) पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
सुरक्षेचा उपाय म्हणून ८.३० वाजेपर्यंत संपूर्ण इस्टेट परिसर रिकामा करण्यात आला आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तपासणीदरम्यान ही वस्तू स्फोटक असल्याची शक्यता गृहीत धरून खबरदारी घेण्यात आली. रात्री ९.३० च्या सुमारास ही संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या हडपसर पॅराग्लायडिंग सेंटरच्या मैदानात नेण्यात आली, जिथे बीडीडीएस पथकाने ती निकामी केली.
आरोपीचा सीसीटीव्ही समोर
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच आता ही वस्तू ठेवणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपी हा इलेक्ट्रिक स्कूटरमधून रुग्णालय परिसरात आला होता. त्याने अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छता गृहात ही वस्तू ठेवली. सध्या आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.