Pune Cafe : पुण्यातील एका कॅफेमध्ये चॉकलेट शेकच्या नावाखाली 'उंदीर शेक' (Rat in Shake) दिल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोहगाव येथील एका कॅफेमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्हेलेंटाइन डे निमित्ताने दोन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री एका फूड डिलिव्हरी अॅपवरुन शेकची ऑर्डर केली होती. त्यानंतर यातील एका शेकमध्ये चक्क मृत उंदीर पाहून दोघांनाही धक्काच बसला. दरम्यान या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगावमधील दोन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून चॉकलेट शेकची ऑर्डर केली होती. त्यातील एक 21 वर्षीय विद्यार्थी ते शेक प्यायला. सुरुवातीला त्याला काहीच जाणवलं नाही. मात्र शेक प्यायल्यानंतर ग्लासाच्या तळाला मेलेला उंदीर पाहून त्याला धक्काच बसला. यानंतर मुलगा तातडीने रुग्णालयात गेला आणि त्याने तपासणी करून घेतली. तरुणाची प्रकृती व्यवस्थित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
नक्की वाचा - Ex MLA Death : किरकोळ कारणावरुन वाद, रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
या प्रकरणात विद्यार्थ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र कॅफे मालकाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या उंदराची तपासणी करण्यात आली असता त्याच्या अंगावर कापल्याच्या खुणा आहेत. उंदीर चुकून मिक्सरमध्ये पडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅफेमधील कर्मचाऱ्याचं लक्ष नसल्यामुळे हे शेक तसंच पार्सल करण्यात आलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी पोलीस या प्रकरणात कॅफे मालकाची चौकशी करीत आहेत.