अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune News: पुणे शहरातील बेकायदा जाहिरात फलकांवर आळा घालण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर QR कोड लावणे बंधनकारक असणार आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ९ मे २०२२ जाहिरात नियंत्रण नियमावलीनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
VIDEO: धाड, धाड... डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, सुरक्षा रक्षकांनी वाचवले; जगात खळबळ
समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना, पुणे महानगरपालिकेने यावर ठोस उपाययोजना आखली आहे. शहरातील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर आता 'QR कोड' लावणे बंधनकारक करण्यात आले असून, यामुळे एका क्लिकवर संबंधित फलकाची कुंडली समोर येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ९ मे २०२२ च्या जाहिरात नियंत्रण नियमावलीनुसार पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही अंमलबजावणी सुरू केली आहे.
पुणे महापालिकेच्या या निर्णयामुळे जाहिरात व्यवसायातील पारदर्शकता वाढणार आहे. अनेकदा शहरात विनापरवाना किंवा मुदत संपलेले फलक बेधडकपणे उभे असतात. आता प्रत्येक फलकाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात QR कोड असणे अनिवार्य असेल. हा कोड स्कॅन केल्यावर संबंधित फलकाची परवाना प्रत, नूतनीकरणाची स्थिती, मालकी हक्क आणि परवान्याची मुदत अशी सर्व माहिती उपलब्ध होईल. ज्या फलकांवर हा कोड नसेल, ते थेट 'बेकायदा' मानले जातील.
अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी यासंदर्भात कडक आदेश निर्गमित केले असून, २७ मेपासून शहरात व्यापक कारवाईला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, कारवाईत कुचराई करणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत हे कोड उपलब्ध करून दिले जात असून, त्यातील माहिती बदलण्यासाठी पालिकेची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे नागरिकांनाही आता अधिकृत आणि अनधिकृत फलकातील फरक सहज ओळखता येणार आहे.