यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा थेट सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प तांत्रिक अडचणींमुळे अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः या निर्णयाला दुजोरा दिला आहे. हा थेट रेल्वे मार्ग तयार करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र हा प्रकल्प रद्द झाला असला तरी रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन आणि अत्यंत फायदेशीर पर्याय शोधून काढला आहे. आता हा रेल्वे मार्ग थेट न जाता चार प्रमुख शहरांना जोडत पुढे जाणार आहे. या नवीन निर्णयामुळे केवळ पैशांची मोठी बचत होणार नाही, तर प्रवासाचा वेळही थेट मार्गाइतकाच लागणार आहे.
नवा रेल्वे मार्ग आणि रेल्वेचा वेग
थेट मार्ग रद्द झाल्यानंतर आता हा नवीन रेल्वे मार्ग पुणे-अहिल्यानगर, अहिल्यानगर-शिर्डी आणि शिर्डी-नाशिक असा जोडला जाणार आहे. या नवीन अलाइनमेंटनुसार नाशिक ते शिर्डी यादरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग तयार केला जाईल. या नवीन मार्गावर रेल्वे गाड्या तब्बल 160 किमी प्रति तास या वेगाने धावू शकतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या थेट मार्गावरून प्रवासासाठी जेवढा वेळ लागला असता, जवळपास तेवढ्याच वेळेत या नवीन फिरून जाणाऱ्या मार्गामुळे प्रवास पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचे कोणतेही नुकसान होणार नाही.
( नक्की वाचा : Devabhau Taxi मुंबईत Ola, Uber ची मनमानी संपणार! महायुती सरकार सुरु करणार 'देवाभाऊ टॅक्सी' वाचा काय आहे योजना )
खर्चामध्ये तब्बल दोन तृतीयांश बचत
या नवीन मार्गामुळे सरकारचा हजारो कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. पूर्वीच्या थेट रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 35000 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित होता. मात्र, नव्या नियोजनामुळे हे संपूर्ण काम मूळ खर्चाच्या केवळ 1/3 म्हणजेच एक तृतीयांश खर्चात पूर्ण होणार आहे. या नवीन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून, यातील बऱ्याच मोठ्या भागाला मंजुरीही मिळाली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून याचा फायदा प्रवाशांना खूप लवकर मिळेल, असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Confirming that the direct Pune–Nashik semi-high-speed rail route has been scrapped due to critical technical conflicts, Union Minister Ashwini Vaishnaw says, "The Pune-Nashik issue has been resolved. A direct route is not being built. It's become… https://t.co/pOvsQlAuiO pic.twitter.com/55Wznoclty
— ANI (@ANI) June 17, 2026
पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट आणि क्षमता वाढणार
पुणे-नाशिक रेल्वेच्या या मोठ्या निर्णयासह रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड पुनर्रचना प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्मची संख्या सध्याच्या 6 वरून थेट 12 करण्यात येणार आहे.
या विस्तारीकरणाच्या आणि क्षमतेच्या कामाला आजपासूनच अतिशय वेगवान सुरुवात झाली आहे. प्लॅटफॉर्मची संख्या दुप्पट होणार असल्यामुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे.
भव्य इमारतीपेक्षा प्रत्यक्ष कामावर रेल्वेचा भर
रेल्वे स्थानकाच्या केवळ भव्य इमारती उभ्या करणे किंवा केवळ सौंदर्यीकरण करण्यापेक्षा स्थानकाची प्रत्यक्ष रेल्वे हाताळणी क्षमता वाढवण्यावर रेल्वे प्रशासनाचा मुख्य भर असेल. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, नवीन इमारत उभी करणे सोपे असते, मात्र रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष क्षमता वाढवणे हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काम असते. त्यामुळे प्रशासनाने आधी हे कठीण काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरवले असून प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world