- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Nasrapur Rape Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अतिशय क्रूर अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी जलद गतीने पार पडली असून विशेष न्यायालयाने आज (25 जून) आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा आज अंतिम निकाल लागणार आहे. न्यायाधीशांनी कामकाज सुरू करताच आरोपी भीमराव कांबळे याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे कोर्टात स्पष्ट केले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही आठवड्यांतच तपास यंत्रणा आणि न्यायालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून आज नराधम भीमराव कांबळेला न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
(नक्की वाचा: Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात)
सुनावणीदरम्यान कोर्टामध्ये काय-काय घडले? | Nasrapur Rape Case Court Verdict Live Updates
कामकाजाला सुरुवात होताच न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळे याला पुन्हा एकदा त्याचे नाव विचारून खात्री केली. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला थेट शब्दात सुनावले की, "ज्या-ज्या आरोपांखाली तुला अटक करण्यात आली होती, ते सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. तुझ्यावर असलेले सर्व गुन्हे तुला वाचून दाखवण्यात आले आहेत."
न्यायाधीश पुढे म्हणाले, "या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तुला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते किंवा आजन्म कारावासही लागू शकतो. यामध्ये तुला कमीत कमी 20 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते."
न्यायाधीशांनी आरोपीला विचारला 'तो' प्रश्न
आरोपीवर दोष सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी भीमराव कांबळे याला 1 मे रोजी दुपारी नक्की काय घडले होते, याची आठवण करून देण्यास सांगितले. "त्या दिवशी दुपारी गुन्हा करताना तू काय काय केले होतेस, ते पुन्हा एकदा सांग," असे आदेश न्यायाधीशांनी भीमरावला दिले.
न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षेचे पर्याय स्पष्ट केल्यामुळे आता या नराधमाला फाशीची शिक्षा मिळणार की जन्मठेपेची, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काहीच वेळात यावर अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
"फक्त शिक्षेबद्दल बोल!" भीमराव कांबळेला कोर्टाने झापले
न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला 1 मे रोजी काय घडले होते, याची विचारणा केली. त्यावर भीमराव म्हणाला, "त्या दिवशी मी तिला गोठ्यात घेऊन गेल्यानंतर तिच्या डोक्याला मारहाण झाली, ती जास्तच ओरडत होती..." आरोपी घटनेचे क्रूर वर्णन करू लागताच न्यायाधीशांनी त्याला मध्येच थांबवले. "आता फक्त शिक्षेवर बोलायचं!" अशा कडक शब्दांत कोर्टाने त्याला झापले आणि खाली बसण्यास सांगितले. जेव्हा शिक्षेबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपी पूर्णपणे निशब्द झाला होता.
चिमुरडीच्या शरीरावर 18 जखमा
सरकारी वकील यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना गुन्ह्याची भीषणता मांडली. चिमुरडीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता तिच्या शरीरावर तब्बल 18 जखमा आढळल्या होत्या. नराधम भीमरावने चिमुरडीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावरही अत्याचार केला होता. आरोपीने या गुन्ह्यापूर्वी परिसराची रेकी केली होती, ज्यावरून त्याला कायद्याची कोणतीही भीती नव्हती हे स्पष्ट होते. यापूर्वी त्याने प्राण्यावरही अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद आणि फाशीची मागणी
सरकारी वकिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत न्यायालयात सांगितले की, "आरोपीला या अमानुष कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. समाजाचा कायद्यावरील विश्वास उडणार नाही, असा निर्णय दिला जावा. अशी कठोर शिक्षा दिली जावी, ज्यामुळे भविष्यात असा गुन्हा करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही."
त्यांनी पुढे सांगितले की, आरोपीला यापूर्वीही इतर गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली होती. यापूर्वीच्या खटल्यातील निकालांची दखल घेऊनच त्याला शिक्षा दिली जावी. आरोपी इतका प्रवृत्तीने गुन्हेगार आहे की त्याचे कुटुंबीय किंवा गावकऱ्यांमधील कोणीही त्याला भेटायला आलेले नाही, सर्वांनी त्याला नाकारले आहे.
गुन्हा घृणास्पद आणि अमानवीय: कोर्ट
सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयानेही या गुन्ह्याबाबत अत्यंत तीव्र निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने म्हटले की, "आरोपीवरील गुन्हा पूर्णपणे सिद्ध झाला असून त्याने स्वतःही गुन्हा मान्य केला आहे. हा गुन्हा अत्यंत क्रूर, घृणास्पद आणि अमानवीय आहे. आरोपी यापूर्वीही दोन गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला होता. त्याला गावकऱ्यांनी हाकलून दिले आहे आणि कुटुंबातील कोणीही त्याच्या पाठीशी उभे राहिलेले नाही."
न्यायालयाने शेवटी स्पष्ट केले की, निष्पाप लहान मुलीच्या न्याय हक्कासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून न्यायालय आता काही वेळातच आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावणार की जन्मठेपेची, याचा अंतिम निकाल जाहीर करणार आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरण, चिमुरडीला न्याय मिळणार? | Pune Nasrapur Verdict LIVE | NDTV Marathi
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world