देवा राखुंडे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या घरापासून काही अंतरावर फुटपाथवर लिंबू नारळ आढळून आले आहेत. आज सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना ते पाहायला मिळाले. त्यावेळी सजग नागरिकांनी ते बाजूला काढून टाकले. आता हा जादूटोणा आहे का? की अन्य काही अशी चर्चा बारामतीत रंगली आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार राहतात. या सहयोग सोसायटी समोरून बारामती शहरातील एक महत्त्वाचा रस्ता जातो. या रस्त्याच्या बाजूला नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ करण्यात आला आहे. याच फुटपाथवर हा आघोरा प्रकार आज सकाळी काही नागरिकांना पाहायला मिळाला. त्यानंतर ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.
या फुटपाथवर सकाळी व्यायामासाठी गेलेल्या नागरिकांना हळद-कुंकू टाकलेले काही लिंबू नारळ यासोबत इतर काही गोष्टी आढळून आल्या. त्यामुळे कोणीतरी या ठिकाणी जादूटोण्यासारखा अघोरी प्रकार केलाय की काय असा संशय यातून निर्माण झाला. या फुटपात वरून बारामती शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडत असतात. आजही तसंच झालं. व्यायामासाठी काही नागरिक रस्त्यावरून ये जा करत होते. यावेळी काही नागरिकांची नजर या लिंबू नारळ हळदीकुंकवाच्या अघोऱ्या पूजेवर पडली. त्यामुळे हा जादूटोणा की अन्य काही प्रकार याची चर्चा सुरू झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावरच हा प्रकार समोर आला आहे.
त्यानंतर काही सजग नागरिकांनी हे सर्व बाजूला काढून टाकलं. मात्र हा जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो जादूटोण्याचा भाग आहे की वेगळे काही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि विचाराने प्रगल्भ असणाऱ्या बारामतीत असे प्रकार घडणे हे धक्कादायक समजलं जातं आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बारामती पोलिसांकडेही कोणतेही माहिती उपलब्ध नाही. बारामती शहरात याची जोरदार चर्चा रंगली असून काही जणांचा अंदाज आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना जवळ अशाप्रकारे लिंबू नारळ ठेवले जाणे हे सामान्य माणसाचं काम नाही.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
कोणी सामान्य माणूस हे धाडस करू शकत नाही. हा नक्कीच कोणाच्यातरी अंधश्रद्धेचा भाग असावा किंवा दृष्ट टाकण्याच्या हेतूने केलेला प्रकार असावा. तर काही जण असा अंदाज लावत आहेत की हे जादूटोण्याचा स्वरूप नसून कोणीतरी विनाकारण टाकलेले पदार्थ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत अशी मागणी होत आहे. हे सर्व या ठिकाणी कसं घडलं, कोणी केलं किंवा याच्या पाठीमागे कोण आहे याचा तपास करावा अशी मागणी करण्यात येत आहे.