Pune News: नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी यकृतदान केले, आठवडाभरात बायकोचेही निधन; सह्याद्री हॉस्पीटल पुन्हा वादात

कोमकर यांच्या नातेवाईकांकडून सह्याद्री हॅास्पिटलवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीला लिव्हरची गरज असतो त्याला धोका असतो, मात्र डोनरच्या मृत्यूवरुन अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune News : पुण्यात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेदरम्यान (Husband and wife die during liver transplant) पती - पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असे मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री रुग्णालयात (Sahyadri Hospital in Pune) ही शस्त्रक्रिया पार पडली. कोमकर यांच्या नातेवाईकांकडून सह्याद्री रुग्णालयावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीला लिव्हरची गरज असतो त्याला धोका असतो, मात्र डोनरच्या मृत्यूवरुन अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 

काय आहे प्रकरण?  

बापू बाळकृष्ण कोमकर यांना लिव्हर सिरहॉसिस होता. त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांनी पतीला लिव्हर देण्याचं ठरवलं. 20 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लानंटची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र बापू कोमकर यांना वाचवणं शक्य झालं नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी कामिनी कोमकर रुग्णालयात दाखल होती. दोन दिवसांपूर्वी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर कोमकर कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोमकर यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. अचानक आई-वडिलांच्या मृत्यूने मुलांना धक्का बसला आहे. दोघेही मुलं अद्याप शिक्षण घेत आहे. यापुढे काय करावं असा मोठा सवाल त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. रुग्णालयाने या ट्रान्सप्लांटसाठी 12 लाखाची मागणी केली होती. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी कसेबसे पैसे जमा केले होते.  

नक्की वाचा - भटक्या कुत्र्यांची दहशत! पुण्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणावर कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पाहा Video

सह्याद्री रुग्णालयाचं स्पष्टीकरण

आम्ही रुग्णाच्या कुटुंबियांच्या या दुःखद परिस्थितीत सोबत आहोत. लिव्हर ट्रान्सप्लांट ही अतिशय जटिल आणि मोठ्या जोखमीची शस्त्रक्रिया असते. या प्रकरणात रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील लिव्हरचा आजार म्हणजे लिवर सिरहॉसिस होता. प्रोटोकॉलनुसार कुटुंबीयांना या जोखमींबाबत आमच्यातर्फे आधीच सविस्तर माहिती देण्यात आली होती. शस्त्रक्रिया सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय नियमांनुसार करण्यात आली. दुर्दैवाने, ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका (कार्डिओजेनिक शॉक) आला आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. दात्याची प्रकृती सुरुवातीला सुधारत होती, पण शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी अचानक रक्तदाब खूप कमी झाला (हायपोटेन्सिव्ह शॉक) आणि त्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले. जे प्रगत उपचार करूनही नियंत्रित करता आले नाही. आम्ही उच्चतम दर्जाची सेवा देण्यास नेहमीच कटिबद्ध आहोत आणि या दुःखद काळात आम्ही शोकग्रस्त कुटुंबियासोबत आहोत.