Pune Vasant More News: पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्या म्हणजेच अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
वसंत मोरेंना कोणत्याही क्षणी अटक होणार?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांनी वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल दाखल केला होता. लहाडे यांचे वडील विश्वनाथ तुकाराम लहाडे यांच्या बद्दल वसंत मोरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.
याप्रकरणात वसंत मोरे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंनी युक्तीवाद ऐकून घेत वसंत मोरेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयाने वसंत मोरे यांना मोठा धक्का बसला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांना वसंत मोरे यांना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमधील वक्तव्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांच्या वडिलांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विश्वनाथ तुकाराम लहाडे हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहिती असतानाही त्यांनी अपमानास्पद वक्तव्य केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world