Pune News: पुणे जिल्ह्यातल्या चाकण आणि खेड पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा लवकरच दूर होणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील एका महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला गती आली असून यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.नाशिक फाटा ते खेड यादरम्यानच्या उन्नत मार्गासाठी तब्बल 7827 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सिंगल पिलरवर 8 पदरी उन्नत मार्ग
हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) राबवला जात असून यात आधुनिक अभियांत्रिकीचा वापर केला जाणार आहे. हा 8 पदरी उन्नत मार्ग केवळ एका खांबावर (सिंगल पिलर) उभा असेल, ज्यामुळे जमिनीचा कमीत कमी वापर होईल. या उन्नत मार्गासोबतच सध्याचा चार पदरी महामार्ग देखील सहा पदरी केला जाणार आहे. अशा प्रकारे हा रस्ता एकूण 14 पदरी होणार असून त्यामुळे वाहनांचा वेग वाढणार आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat: धक्कादायक! मंत्रिमंडळ निवडीतही खरातची लुडबुड? अजित पवारांच्या दरबारात थेट पोहोचला होता निरोप )
स्थानिक आणि लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी होणार
सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक पूर्णपणे वेगळी केली जाईल. भोसरी, मोशी, चाकण आणि खेड यांसारख्या मोठ्या औद्योगिक केंद्रांना यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये दररोज कामासाठी जाणाऱ्या लाखो कामगारांना आणि उद्योजकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळेल. तासनतास चालणाऱ्या ट्रॅफिक जॅममधून त्यांची कायमची सुटका होण्यास मदत होईल.
(नक्की वाचा : Monsoon 2026: सावधान! यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी? महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, पाहा काय आहे अंदाज )
प्रादेशिक विकासासाठी मैलाचा दगड
आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या भोसरी ते मोशी दरम्यानच्या भूसंपादनातील तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा उन्नत मार्ग पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.