सुरज कसबे, पुणे
Maval Tourism: मावळ तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर सध्या मृत्यूचे सावट पसरले असून, गेल्या चार महिन्यांत तब्बल २५ पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाढती उष्णता आणि सुट्ट्यांमुळे धरणे व नद्यांवर गर्दी वाढत असली, तरी पर्यटकांचा निष्काळजीपणा त्यांच्या जिवावर बेतत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Khambatki Tunnel: खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीला ब्रेक! धोकादायक वळणांतून सुटका, वाहनचालकांना दिलासा
मावळात जलपर्यटन ठरतेय जीवघेणे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पवना धरण, आंद्रा धरण, कासारसाई, कुंडमळा आणि इंद्रायणी नदीच्या परिसरात बुडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अचानक लागणारे खोल खड्डे आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे पर्यटकांचा अंदाज चुकतो. सेल्फीचा मोह, मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे आणि सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे ही अपघातांची मुख्य कारणे आहेत.
वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमचे लीडर निलेश गराडे यांनी पर्यटकांना धोक्याच्या ठिकाणी न उतरण्याचे आवाहन केले आहे. सूचना फलक असूनही पर्यटक नियम मोडतात, अशांवर आता कडक कारवाईची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, जलतरण प्रशिक्षक स्नेहल बोत्रे यांनी पोहण्यासाठी सुरक्षित जलतरण तलावांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे.
शनिवार-रविवारी होणाऱ्या तुफान गर्दीच्या तुलनेत प्रशासन आणि पोलिसांची उपस्थिती अपुरी पडत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत. अनेक ठिकाणी जीवरक्षक आणि आपत्कालीन सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.